आद्र्रा नक्षत्रात दमदार सुरुवात केलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे उघडीप दिल्याने खरीप पिकाच्या पेरण्या थांबल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत केवळ शिराळा तालुक्यातच अवघा १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अन्य ठिकाणी कोरडे वातावरण आहे.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आद्र्रा नक्षत्रात जत व आटपाडी तालुके वगळता जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र गुरुवारी रात्रीपासून केवळ जोरदार वारे वाहत असून पावसाचा पत्ताच नाही. यामुळे कालपर्यंत कृष्णा वारणा नदीच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ कमी झाली असून शनिवारी पाणीपातळी दोन फुटांनी उतरली आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण असून पाऊस थांबल्याने पेरणीची कामेही थांबली आहेत. हलक्या रानावर करण्यात आलेली पेरणी असेच आणखी दोन दिवस हवामान राहिले तर दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याचा धोका शेतकरी व्यक्त करीत आहेत. जोरदार वाऱ्यामुळे उगवणीच्या स्थितीत असलेले कोवळे कोंब मातीमोल होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. शेतकऱ्याचे ढगाकडे डोळे लागले आहेत.