पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलावरून बुधवारी पडलेल्या तनवेल अशोक कदम (वय २०, मूळ रा. नाशिक) या विद्यार्थ्यांने परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तो ‘सेल्फी’ काढताना पुलावरून पडल्याची चर्चा होती.लोणावळा ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. तनवेल हा ‘सेल्फी’ काढताना पडला असावा, अशी चर्चा बुधवारी करण्यात येत होती. मात्र, त्याचा मोबाईल त्याच्या खिशात सापडल्याने तनवेल हा खाली पडला की त्याने आत्महत्या केली यादृष्टीने तपास सुरू झाला होता. त्यानुसार प्राथमिक तपासात त्याने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तनवेल हा लोणावळ्याजवळील सिंहगड महाविद्यालय कुसगाव येथे मेकॅनिकल इंजिनीअिरगचे शिक्षण घेत होता. त्याने दुसऱ्या वर्षांची परीक्षा दिली होती. त्यात तो चार विषयांमध्ये नापास झाला होता.  तो नाशिक येथून कुटुंबीयांकडून तृतीय वर्षांच्या प्रवेशासाठी शुल्क घेऊन आला होता. मंगळवारी रात्री महाविद्यालयातील मित्रांच्या खोलीवर त्याने मुक्काम केला. बुधवारी सकाळी बाहेर जातो, असे सांगून तो मित्राच्या खोलीतून निघाला होता.