देशातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून येत्या १५ दिवसांच्या आत आराखडा अधिसूचना काढण्यात येणार अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिली. ठाण्याच्या त्रिभाजनाविषयी संजय दत्त यांनी लक्षवेधी सादर केली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजानासंदर्भात शासन पातळीवर प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पालघर, वसई, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी व वाडा इत्यादी आदिवासीबहुल भागांचा समावेश ‘पालघर’मध्ये करण्यात येईल तर ठाण्यात नवी मुंबई, बदलापूर, शहापूर, मुरबाड, मीरा-भाईंदर आणि कल्याण या भागाचा समावेश असेल.
ठाण्याचे शहर व ग्रामीण असे दोन भाग एकत्र करून पालघर या जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात येणार आहे. तथापि ठाणे जिल्ह्य़ातील २४ पैकी ११ आमदारांची अनुकूलता असून कल्याण जिल्हा निर्माण करण्याची नागरिकांकडून होत असलेली मागणी, एक कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ाचे वेगाने नागरीकरण होत असून एक कोटीहून अधिक लोकसंख्या वाढीचा हा दर कल्याण पट्टय़ात सर्वाधिक असल्याने ‘कल्याण’ हा स्वतंत्र जिल्हा करण्याबाबत येत्या १५ दिवसांमध्ये आराखडा अधिसूचना काढून नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्यात येणार असल्याचे थोरात म्हणाले.
या जिल्ह्य़ांची निर्मिती करण्यासाठी कुणी २५० कोटी कुणी ६०० कोटी लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नक्की किती कोटी खर्च लागेल, असा प्रश्न विनोद तावडे यांनी उपस्थित केला. तसेच ठाण्याचे चार भाग करण्याची मागणी पुढे आली आहे. आधी दोन भाग करा, अशी सूचना तावडे यांनी केली. तर माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुलेंच्या काळात सिंधुदुर्ग आणि लातूर या दोन जिल्ह्य़ांची निर्मिती करताना नेमकी कोणती प्रक्रिया राबवली याची विचारणा जयंत पाटील यांनी केली. त्यावर अंतुले यांच्या काळातील विभाजनाची प्रक्रिया देखील लक्षात घेण्यात आली असून त्यानुसार जिल्ह्य़ांचे विभाजन लवकरात लवकर करू आणि त्यासाठी खर्च करण्याची शासनाची तयारी असल्याचे थोरात
म्हणाले.