डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने ‘एसआयटी’ची स्थापना करावी, अशी मागणी विधिमंडळातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील व कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहातील सर्वपक्षीय सभेत ते बोलत होते. महापौर आ. संग्राम जगताप, आ. अरुण जगताप, आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड आदी या वेळी उपस्थित होते. आबा व पानसरे या दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन काम करणारे आबा यांची अजातशत्रू अशीच ओळख होती, तर भाई पानसरे शोषितांचा आवाज होते. दोघांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. पानसरे पुरोगामी विचारांचा वारसा समर्थपणे चालवत होते. दाभोलकरांप्रमाणेच पानसरे यांच्या हत्येचा व आरोपींचा तपास लागलेला नाही, ही पुरोगामी विचारांचीच हत्या आहे. राज्य सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन करावी किंवा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करून विखे म्हणाले, की हल्लेखोरांना पकडण्यासाठी राज्य सरकारकडे इच्छाशक्ती हवी, या दोन्ही घटनांचा तपास त्वरित लावून आरोपींना कडक शासन होणे आवश्यक आहे.
आ. कर्डिले म्हणाले, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आर. आर. पाटील यांच्यासारखे नेते पुन्हा राज्याला मिळणार नाहीत. आबा सत्तेत व विरोधी असतानाही चुका आक्रमकपणे दाखवत. कॉ. पानसरे तर गोरगरिबांसाठीच काम करत अशांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारवरच आहे. त्यांची हत्या झाली तरी त्यांचे विचार कधीच संपणार नाहीत.
या वेळी महापौर जगताप यांनी प्रास्ताविक केले. आ. मुरकुटे, आ. जगताप, गुंड, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर कदम, सभापती संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आभंग, घनश्याम शेलार, कॉ. बाबा आरगडे, विनायक देशमुख, उबेद शेख, संजय झिंजे, शारदा लगड, अरुण कडू आदींची भाषणे झाली. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.