सवाई गंधर्व महोत्सवाचे आजचे हे दुसरे पुष्प. स्वरमंचावर उस्ताद वसीम अहमद खाँ यांचे आगमन झाले. गंगुबाई हनगल, उस्ताद शाहीद परवेझ या गुरूंचे मार्गदर्शन या गुणी कलाकारास लाभले आहे. आग्रा घराण्याच्या परंपरेनुसार त्यांनी सर्वप्रथम ‘पूर्वी’ या जनक रागामधील आलाप, नोम तोम सादर केले. त्यानंतर तंत अंग व विलंबित एकतालामध्ये ‘नैय्या मोरी पार करो’ ही बंदिश सादर केली. दाणेदार स्वर, लगाव, बढत लयकारी या सर्वामध्ये एक प्रकारची शिस्त जाणवली. ‘मथुराना जय्यो मोरा कान्हा।’ ही तीन तालामधील चीज भावपूर्ण स्वरांनी सादर केली.’
राग बिहारी कल्याणमधील चीज त्रितालात अतिशय दर्जेदार आलाप, ताना, खटक्या, मुरक्या यांचे वैविध्याने गायिली. शेवटी ‘कहाँ गये श्याम’ हे मिश्र देस रागावर आधारित भजन गायिले. त्यांना तबल्यावर श्री. अशोक मुखर्जी तर स्वरसंवादिनीवर मिलिंद कुलकर्णी, श्रुतींवर विकास भावे, विनय चित्राव यांनी साथ केली.
यानंतर पं. उल्हास बापट यांचे संतूरवादन झाले. सादरीकरणासाठी त्यांनी ‘पूर्वा कल्याण’ हा सायंकालीन राग निवडला. संतूर हे काश्मीर घाटीतून आलेले प्राचीन वाद्य आहे. सर्वप्रथम मुक्त आलापी झाली. स्वरांची शुद्धता, सुस्पष्ट विचार आणि अंतरंगामधील शुद्ध भावना यांनी ओथंबलेले स्वर ‘इये हृदयीचे तिये। घातले हृदयी।।’ या ज्ञानोबांच्या ओवीनुसार श्रोत्यांच्या हृदयाला जावून भिडले आणि मग शांतीचे साम्राज्य या सर्व शामियान्यात पसरले. हेच या परिपक्व कलाकाराचे यश आहे असे म्हणावे लागेल. पं. रामदास पळसुले यांनी सुंदर साथ त्यांनी केली. झपतालामधील ही गत रंगतच गेली.
शेवटी काफी टप्प्याने त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. टप्पा हा पंजाब तसेच राजस्थानच्या वालुकामय प्रदेशातून आपल्याकडे आला. उंटाच्या चालण्याच्या ठेक्यावर हे ग्राम्य गीत गायिले जायचे. त्यासाठी आवाजात फिरक व स्वरांवर प्रभुत्व फारच आवश्यक असते. ही किमया संतूरवर करून दाखविली ती या वीणावादकाने. खास श्रोत्यांच्या आग्रहाखातर पं. रामदास कामतांनी अजरामर केलेले यमन रागावर आधारित ‘देवा घरचे ज्ञान कुणाला।’ हे नाटय़गीत मोठय़ा नजाकतीने सादर करून आपले देखणे वादन थांबविले. गौरी लिमये यांनी श्रुतीवर साथ केली.
यानंतर शोवना नारायण आणि सहकलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर केला. सर्वप्रथम ओंकार, त्यानंतर रावणकृत शिवतांडव नृत्य सादर केले. शंखध्वनीने हे नृत्य झाल्यानंतर शिवस्तुतीपर चक्रधार, भगवान गौतम बुद्ध, यशोधरा व पुत्र यांच्या आयुष्यातील भावोत्कट प्रसंगही सादर केले. आजच्या या स्वरसोहळ्याची सांगता पद्मश्री बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने झाली. सर्वप्रथम त्यांनी सादरीकरणासाठी ‘मारुबिहाग’ हा राग निवडला. स्वरसंवादिनीवर श्रीनिवास आचार्य, तर तबल्यावर मुकुंदराज देव होते. श्रृतीवर विद्या जाईल, मीरा वैद्य व सतीश शेटे होते. ‘साजन कैसे बीन’ ही विलंबित एकतालातील सुप्रसिद्ध बंदिश अतिशय हळूवार स्वरांनी सुरू केली. एक-दोन आवर्तनातच रागाचा आकृतीबंध उभा करण्याचे कसब या गायिकेकडे आहे. आकारयुक्त आलापी. खर्ज सप्तकामधून घेतलेली तान अतितार सप्तकातील षडजापर्यंत पोहोचविणारी बहुधा ही एकमेव गायिका असावी. प्रत्येक आलाप तानेने चैतन्य व आनंदाच्या लहरी श्रोत्यांमध्ये पसरत होत्या. त्यानंतर द्रुत त्रितालात हीच बंदिश ‘कवन नं’ वेगवान सरगम, पुकार, कल्पकता व रियाज याचा हे गायन म्हणजे उच्चांक होता.
यानंतर ‘मलुहा मांड’ रागामधील एक चीज झपतालात अशीच सुरेख सादर केली, तर द्रुत त्रितालात एक तराणा सादर केला. ‘रसिका तुझ्याचसाठी’ हे त्यांचेच भावगीत तितक्याच उत्साहाने केवळ रसिकांसाठी त्या गायिल्या. शेवटी ‘भवानी दयानी’ ही ‘भैरवी’तील बंदिश अत्यंत भावपूर्ण, आर्त स्वरांनी सादर करून महोत्सवाचे दुसरे सत्र संपविले.