अमरावती जिल्ह्य़ातील अनेक सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत असताना पश्चिम विदर्भातील इतर भागात केवळ १५ ते २० टक्के जलसाठा, असे विरोधाभासी चित्र आहे. विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये २९ जुलैअखेर ४० टक्के जलसाठा झाला आहे. सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पाचा पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला असून धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. दुसरीकडे अकोला जिल्ह्य़ातील काटेपूर्णा, यवतमाळ जिल्ह्य़ातील अरुणावती आणि पूस, बुलढाणा जिल्ह्य़ातील पेनटाकळी या मोठय़ा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून कमी जलसाठा झाला आहे.
मान्सूनचे उशिरा आगमन आणि त्यातही पावसाने दिलेला खंड यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा यंदा होणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती, पण काही सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणे काठोकाठ भरली, तर अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली असून सध्या या धरणात ५०६ दशलक्ष घनमीटर (९० टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरण ८० टक्के भरले होते. बुलढाणा जिल्ह्य़ातील वाण प्रकल्पात ६९ दलघमी (८४ टक्के), खडकपूर्णा प्रकल्पात ५७ दलघमी (५० टक्के), यवतमाळ जिल्ह्य़ातील बेंबळा प्रकल्पात १०३ दलघमी (७० टक्के) पाणीसाठा झाला आहे. इतर प्रकल्पांमधील पाणीसाठय़ाची स्थिती समाधानकारक नाही.
यवतमाळ जिल्ह्य़ातील अरुणावती प्रकल्पात २५ दलघमी (१५ टक्के), पूस १७ दलघमी (१९ टक्के), अकोला जिल्ह्य़ातील काटेपूर्णा १९ दलघमी (२२ टक्के), बुलढाणा जिल्ह्य़ातील नळगंगा २१ दलघमी (३० टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी स्थिती चांगली होती. पूस प्रकल्प शंभर टक्के भरला होता. अरुणावती, काटेपूर्णा, वाण, बेंबळा प्रकल्पांमध्ये ८० टक्क्यांवर पाणीसाठा होता.
अमरावती जिल्ह्य़ातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सापन या मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने धरणांचे दरवाजे उघडावे लागली. चारगड प्रकल्प देखील ओव्हरफलो झाला आहे.
अमरावती विभागातील अनेक मध्यम प्रकल्पांमध्ये अजूनही पुरेसा साठा झालेला नाही. २३ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या २५८ दलघमी (३९ टक्के), तर लघू प्रकल्पांमध्ये केवळ २२८ दलघमी (२६ टक्के) जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात मध्यम प्रकल्पांमध्ये ५६, तर लघू प्रकल्पांमध्ये ६४ टक्के जलसाठा होता. अमरावती जिल्हा वगळता विभागातील इतर जिल्ह्य़ांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी नसल्याने ही स्थिती ओढवली आहे.
विभागात अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्य़ांनी पावसाची सरासरी ओलांडली असून आतापर्यंत अमरावती जिल्ह्य़ात ४३० मि.मी. पावसाची (१०६ टक्के) नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्य़ात ३९५ मि.मी. (११२ टक्के), बुलढाणा १७० मि.मी (५२ टक्के), वाशीम २१८ मि.मी. (५४ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्य़ात १७१ मि.मी. (३७ टक्के) पाऊस झाला आहे.