ग्रामीण भागात जात-पोटजात संस्कृती घट्ट असून, त्या ठिकाणी सम्यक विचार पोहोचण्याची आवश्यकता आहे. शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अशी संमेलने होत असताना ग्रामीण भागात मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. मग हा विचार मागास भागात कधी पोहोचणार, असा सवाल औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले.
सम्यक साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘भारतीय संविधानातील मूल्ये आणि मराठी साहित्य’ या परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे होते. या परिसंवादात स्त्रीवादी लेखिका डॉ. इंदिरा आठवले, राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे डॉ. रणधीर शिंदे, पुणे विद्यापीठातील प्रा. प्रभाकर देसाई, पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रा. हरि नरके, आंबेडकरी विचारवंत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी भाग घेतला होता.‘स्वातंत्र्यानंतर संविधानाला अपेक्षित नवी संस्कृती आपण घडवू शकलो नाही. सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता चालविली आहे. सत्ताविहीन लोकांनी परिवर्तनाचा आग्रह धरला आहे, पण जात- पोटजात संस्कृती घट्ट होत आहे. आपली समाजभूमी जातीधिष्ठित असल्यामुळे कुठल्याही भूमिका बदलल्या नाहीत. पांडुरंगाइतकी संविधान मूल्ये का रूजली नाही?
जातीय अस्मिता सर्वानीच कुरवाळल्या आहेत,’ असे डॉ. लुलेकर म्हणाले. डॉ. जोंधळे म्हणाले , ‘शोषितांनी राजकीय पर्यायाची दिशा मजबूत केली पाहिजे. समाजाचे आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय प्रश्न टाळणे चूक आहे. डॉ. आंबेडकरांना धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकाभिमुख लोकशाही अपेक्षित होती. एक व्यक्ती-एक मूल्य हा संविधानाचा मूळ विचार आहे. त्यामुळे समाजातील शोषित वर्गाच्या बाजूची भूमिका घेणे गरजेचे आहे. भूमिका न घेणे हे तुम्ही कुणाच्या बाजूने आहात हे दाखविते.’