सोलापूर जिल्ह्य़ातील पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, कुर्डूवाडीसह नऊ नगरपालिकांच्या हद्दीत जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईत शासकीय मालकीच्या जागेवरील सुमारे अडीच हजार अतिक्रमणे दूर करण्यात आली. ही अतिक्रमणे गेल्या २० वर्षांपासून अस्तित्वात होती. या कारवाईमुळे सर्वच नगरपालिकांच्या ठिकाणी मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी मुंडे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांनी महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या तोंडावर यात्रेच्या परिसरातील अतिक्रमणे प्रभावीपणे मोहीम राबवून हटविण्यात आली. त्यापाठोपाठ पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, कुर्डूवाडी, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, दुधनी व मैंदर्गी या पाच नगरपालिकांच्या हद्दीतही कमी-जास्त प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. त्याकडे जिल्हाधिकारी मुंडे यांनी लक्ष घालून त्या त्या नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना अतिक्रमणे महिनाभरात दूर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत सर्वाधिक ८२० अतिक्रमणे बार्शीत होती. ती हटविण्यात आली. याशिवाय पंढरपुरात ८२० अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच अक्कलकोटमध्ये ३४०, करमाळ्यात ४००, कुर्डूवाडीत २५०, सांगोल्यात २३० याप्रमाणे अतिक्रमणे दूर करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून बहुसंख्य अतिक्रमणे मुख्य रस्त्यांवर रहदारीच्या ठिकाणी वाढली होती. पोलीस बंदोबस्त मागवून ही अतिक्रमणे दूर केल्याने अनेक ठिकाणी रस्ते मोकळे झाल्याचे दिसून येतात. तथापि, अक्कलकोटमध्ये अद्यापि काही ठिकाणी अतिक्रमणे कायम आहेत. मात्र आतापर्यंत झालेल्या कारवाईत विस्थापित झालेले बहुसंख्य टपरीधारक तथा छोटे व्यावसायिक उघडय़ावर पडले आहेत. त्यामुळे पुनर्वसनाच्या मागणीसाठी अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, करमाळा आदी भागात टपरीधारक एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत