रात्री गावात सुरक्षिततेसाठी गस्त घालताना चोरांची टोळी समजून गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वऱ्हाडातील महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला. बार्शी तालुक्यातील माळवंडी येथे हा प्रकार घडला.
दरम्यान, या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात विठ्ठल बाबू कादे (६१, रा. दहिटणे, ता. बार्शी, सध्या रा. गुजर नगर, थेरगाव, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माळवंडी येथील २० ते २५ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत चंद्रभागा कृष्णात कादे (५५, रा. दहिटणे, बार्शी) यांना ग्रामस्थांच्या दगड व काठय़ांचा जबर मार बसून प्राणास मुकावे लागले. वाहनचालक मयूरेश महादेव चव्हाण (रा. रातंजन, ता. बार्शी) हा गंभीर जखमी झाला.
दहिटणे येथील कृष्णात कादे यांचा मुलगा समाधान याचा पुण्यात साखरपुडय़ाचा कार्यक्रम होता. त्यासाठी गावातील पाहुणे मंडळी गेली होती. साखरपुडा आटोपून वऱ्हाड दोन जीपगाडय़ांतून रात्रभर प्रवास करीत गावाकडे परत येत होता. मध्यरात्री उशिरा मालवंडी गावाजवळ वऱ्हाडाच्या गाडय़ा आल्या असता स्थानिक गावकरी अगोदरच चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षिततेचा भाग म्हणून गावच्या शिवारात गस्त घालत होते. गावाकडे दोन जीपगाडय़ा येत असल्याची चाहूल लागताच चोरांची टोळीच येत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना वाटला. त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरडा करताच इतर गावकरी त्या दिशेला पळत आले. गाडी थांबविण्याचा इशारा केला असता गावकऱ्यांच्या काठय़ा व दगड पाहून घाबरलेल्या जीपचालकाने गाडी जागेवर न थांबविता तशीच सुसाट वेगात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ही चोरांचीच टोळी असावी, असा संशय बळावल्यामुळे गावकरी अधिक आक्रमक झाले. त्यातून दगड-काठय़ांनी जोरदार हल्ला झाला. यात जीपच्या मध्यभागी बसलेल्या चंद्रभागा कादे यांच्या डोक्यास दगड लागून त्या गंभीर जखमी झाल्या. वाहनचालक मयूरेश चव्हाण हा देखील जखमी झाला. गाडीतील उर्वरित दहा जण सुदैवाने बचावले. तथापि, जखमींपकी चंद्रभागा कादे यांचा बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वैराग पोलिसांनी हल्लेखोर गावकऱ्यांची नावे निष्पन्न करून धरपकड सुरू केली आहे. यात दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.