तालुक्यातील हिगळजवाडी येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने जिल्ह्याच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची भीती पसरली आहे. तेरमध्ये एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वरचेवर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हिगळजवाडी येथील जिजाबाई विष्णू बोकेफोडे यांना तेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचे निधन झाले. या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचा संदेश मिळताच २४ फेब्रुवारीला सायंकाळी जिल्हा साथरोग निवारण अधिकारी डॉ. एम. आय. काझी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किसन लोमटे यांनी िहगळजवाडी येथे तत्काळ धाव घेतली. त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबातील १४ नातेवाईकांना दहा दिवस आरोग्य खात्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून रोज सकाळी दहा वाजता आरोग्य कर्मचारी घरी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती डॉ. किसन लोमटे यांनी दिली.
दरम्यान याच महिलेची नातेवाईक असलेली मुलगी प्रणाली सुहास सोनवणे हिला २४ फेब्रुवारीला ताप आल्याने तेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दुपारी दाखल करण्यात आले. परंतु साथरोग निवारण पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून व संशयित स्वाइन फ्लू रुग्ण म्हणून उपचारासाठी उस्मानाबाद येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिल्याने प्रणाली सोनवणे हिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.