बुलढाणा पंचायत समितीअंतर्गत गट विकास अधिकारी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भादोला ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस बहुसंख्य महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व दारूबंदीबाबत पुढाकार घेण्याचा संकल्प केला.
निर्मल भारत अभियानातंर्गत जिल्ह्य़ात शौचालयाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हाभर गावागावात प्रबोधन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सभेसाठी निर्मल भारत अभियान कक्षातील संदीप पाटील, संतोष साखरे, पंचायत समिती स्तरावरील जया गवई, वर्षां खेरे यांची उपस्थिती होती. भादोला ग्रामपंचायतीत शुक्रवार, २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासूनच महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेषराव ठेंग यांनी कार्यक्रमाबाबतची भूमिका मांडली. यावेळी उपसरपंच शेषराव ठेंग, सचिव पी.के. साळवे, ग्रामपंचायत सदस्य मोठय़ा संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. सर्व प्रथम निर्मल भारत अभियान कक्षातील माहिती, शिक्षक संवाद सल्लागार संदीप पाटील व संतोष साखरे यांनी शौचालयाअभावी महिलांची होणारी कुचंबणा, शौचालय बांधकाम करायची पध्दती, शासनाकडून मिळणारा प्रोत्साहन बक्षीसाचा लाभ आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करून ग्रामस्थांनी मांडलेल्या अडचणींचेही निरसन केले. आमची ग्रामपंचायत हागणदारीमुक्त करूच, असा संकल्प महिलांनी यावेळी केला. यावेळी सचिव पी.के. साळवे यांनी ज्या कुटुंबांना शौचालय बांधावयाचे आहे त्यांनी त्वरित नाव नोंदणी करावी जेणेकरून त्यांचे जॉब कार्ड काढण्यात येऊन ई-मस्टर जनरेट करता येतील, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गवई यांनी आपली भूमिका मांडली. शौचालय बांधकामासाठी कुटुंबांनी त्वरित ग्रामसेवकाकडे नाव नोंदणी करून शौचालय बांधकाम करून १० हजार रुपयाच्या प्रोत्साहनपर बक्षीसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी केले. भादोला ग्रामपंचायतीने विकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले आहे.