शाळेतल्या त्या दोघींसाठी मी नवा पूर्ण कंपॉसबॉक्स घेऊन गेले. चकित होऊन त्यांनी तो उघडला व आत सर्व साहित्य बघून आनंदाने ओरडायच्याच बाकी होत्या! मी तृप्त झाले. ‘‘परीक्षेत छान लिहायचं बरं का!’’ असा तोंडभरून ‘बेस्ट ऑफ लक’चा भाषांतरित आशीर्वाद देऊन आम्ही परतलो. दुसऱ्या दिवशी फिरायला जाताना कालच्या समाधानाचे मोरपीस सर्वागावर फिरत होतेच. पण..

दिवाळीच्या सुट्टीत पुण्याला आले तरी सकाळी फिरायला जायचा नेम मोडायची इच्छा नव्हती. पण येथे फिरायला जाण्यासाठी ‘रहदारीमुक्त’ रस्ता शोधणे ही रोजची तपश्चर्याच होती. रोज नवनव्या दिशांनी माझी शोधमोहीम सुरू झाली. पहाटेच जायचे त्यामुळे एकदम अंधारी रस्ता नको, रहदारी कमी हवी, पण एकदम सुनसान रस्ता नको, रस्ता थोडा ओळखीचा हवा – अशा अनेक हवं – नकोमध्ये शेवटी एका आडवळणाचा रस्ता सापडला आणि माझी तपश्चर्या फळाला आल्यासारखं वाटलं. मुख्य म्हणजे एक मैत्रीणही मिळाली, जी माझ्यासारखीच एका निवांत रस्त्याच्या शोधात होती. या रस्त्यावरून जाताना आपण पुण्यात आहोत असे वाटतच नव्हतं. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, झाडांना हिवाळी सुगंध – मन अगदी प्रसन्न होत असे. दोन्ही बाजूच्या झाडांमधून मोर, हरीण क्वचित रस्त्यावर दिसायचं.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

या रस्त्यावरून आमच्यासारखी मॉर्निग वॉक घेणारी काही तुरळक मंडळी होती. अधूनमधून फौजी गाडय़ा, कधी स्कूटर-मोटारी दिसत. अशा या रस्त्यावरून सकाळच्या प्रसन्न वेळेला फिरायला जाणं, हा खरंच एक ताजातवाना अनुभव होता तो रोज मिळणार म्हणून आम्ही खूश होतो. पण रस्त्याचे हे ‘निर्मनुष्य अंतरंग’ बघितल्यावर एकटे जायचे-यायचे नाही याचीही खूणगाठ बांधली. एक शंकेची पाल मनात चुकचुकली! सध्या दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू आहेत म्हणून तर हा रस्ता असा रहदारीमुक्त नाही ना? सुट्टय़ा संपल्यावर येथे गर्दी होईल की काय? मन थोडे धास्तावलेच.

सुट्टय़ा संपून माझ्या नातींच्या शाळा सुरू झाल्या, आणि आज ‘रस्ता कसा असेल?’ या विचारात मी फिरायला निघाले. जेव्हा जाताना नेहमीप्रमाणे तुरळकपणे रहदारी व मोजकीच मंडळी दिसली तेव्हा माझ्या उत्साहाने वेग धरला. गप्पा मारता मारता नेहमीच्या ‘टर्निग पॉइंट’वरून आम्ही परतलो आणि परत येताना आम्हाला दोन शाळकरी मुली समोरून येताना दिसल्या. शाळेचा युनिफॉर्म घातलेला, एका हातात स्कूलबॅग, दुसऱ्या हातात वॉटरबॅग, दोन वेण्या घट्ट, त्याला काळ्या रिबिनींचा बो, पायात चप्पल-असा गणवेश! त्यातली एक असेल ७ – ८ वर्षांची, दुसरी थोडी लहान. या अशा रस्त्यावर त्या दोघींना बघून आम्ही थबकलोच. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास, रस्त्यावर सामसुम असताना या दोघी मुली पायी चालत कोणत्या शाळेत जात होत्या? त्यांच्यासोबत मागे – पुढे कोणी असणारच असे वाटून आम्ही थोडे हळूहळू चालू लागलो पण पुढे – मागे कोणीही दिसले नाही. त्या दोघी मात्र झपाझप चालत पुढे निघून गेल्या.

आम्ही दोघी मात्र त्यांच्याकडे वळून वळून बघत राहिलो. त्यांचे आई-वडील त्यांना एकटे या रस्त्याने कसे काय पाठवतात? सध्या दिवस किती वाईट आहेत, रोज पेपरमध्ये काय काय बातम्या येतात, पण या अडाणी, अशिक्षित लोकांना कोण अक्कल शिकवणार? यावर मनसोक्त चर्चासत्र घेत आम्ही परतलो. हे चर्चासत्र घरी दिवाणखाण्यातही दीर्घकाळ रंगले. सर्वाचे एकमत झाले की त्या दोघी कधी भेटल्याच तर त्यांना योग्य शब्दात समज द्यायची. शेवटी शिकलेल्या समाजाने अशिक्षितांना शिकवण द्यायची असते.

मग हा रोजचाच एक छंद जडला! त्या दिसल्या की त्या सुरक्षित आहेत म्हणून बरे वाटायचे व त्यांच्या आई-वडिलांच्या अडाणीपणाला नावं ठेवत व त्यांच्या भविष्याबद्दल चिंता करत आमचा परतीचा प्रवास व्हायचा. असे चार पाच दिवस गेले. आणि मग त्या दिवशी त्या दिसल्याच नाहीत. आम्ही एकदम हतबल! मग लक्षात आले की आज शनिवार असल्याने त्यांची दुपारची शाळा असेल अन् मग एकदम काळजी वाटली. ‘बाप रे! दुपारी तर या रस्त्यावर अजूनच सामसूम असणार! तरी त्या दोघी एकटय़ाच गेल्या असतील? रविवार अस्वस्थतेत गेला. सोमवारची मी आतुरतेने वाट बघत होते. एकदाच्या त्या दिसल्या. विचारलं,

‘‘काय गं कोणत्या शाळेत जाता?’’

‘‘म. न. पा. च्या १० नंबर शाळेत?’’

‘‘कुठे आहे ती शाळा?’’ ‘‘बावधनला’’

‘‘अगं, पण इकडून का जाता?’’

‘‘इकडून जवळ पडती म्हणून जातो.’’

‘‘भीती नाही वाटत.’’

‘‘भीती? अन् ते कशापायी?’’

त्यांचा आत्मविश्वास बघून आम्ही चाट पडलो. मी विचारले, ‘‘कोणत्या वर्गात आहात?’’

‘‘ही चौथीत अन् मी तिसरीत.’’

‘‘घरी कोण कोण असतं?’’ माझ्या नसत्या चौकशा! ‘‘माझे बा, आजी अन् धाकटा भाऊ. आई गावाला गेली हाय, अन् बा छपाईचं काम करतो.’’ ती म्हणाली.

माझी चौकशी आटोपती घेत आम्ही परतलो. पण त्यांच्याशी बोलल्यावर बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी त्या आपणहून हसल्या. बोलताना समजलं की दोन दिवसांनी त्यांची परीक्षा आहे.

‘‘झाला का गं अभ्यास’’? आणि नवा पेन – पेन्सिल आणली का?’’

‘‘नाही! बा म्हणाला जे आहे तेच वापरायचं.’’

ऐकून मला कसंतरीच वाटलं. आपल्या नातींना दर परीक्षेला आपण व त्यांचे आई-वडील कंपॉस – बॉक्समध्ये मावत नाही एवढे पेन – पेन्सिल आणून देतो, अन् या बघा! बिचाऱ्या!!

मला चैन पडेना. दुसऱ्या दिवशी त्या दोघींसाठी मी नवा पूर्ण कंपॉसबॉक्स घेऊन गेले. दोघी भेटल्यावर त्यांच्या हातात दिला. चकित होऊन त्यांनी तो उघडला व आत सर्व साहित्य बघून आनंदाने ओरडायच्याच बाकी होत्या! मी तर तृप्तच झाले. ‘‘परीक्षेत छान लिहायचं बरं का!’’ असा तोंडभरून आशीर्वाद देऊन आम्ही परतलो.

दुसऱ्या दिवशी फिरायला जाताना कालच्या समाधानाचं मोरपीस सर्वागावर फिरत होतंच. परतीच्या वाटेवर दोघी दिसल्या. त्यांच्याबरोबर नऊवारी नेसलेली एक बाई होती. आम्हाला पाहून तिघी थांबल्या त्या आजीबाई बोलायला लागल्या.

‘‘ताई, तुम्हीच दिली न्हवं ही कंपास पेटी? कशापायी?’’

‘‘अहो, त्यांची परीक्षा आहे म्हणून दिल्या.’’

‘‘ताई, तुम्ही चांगल्या मनाने दिलं पण उद्याच्याला कोणा वाईट माणसानं काही द्यावं अन् यांनी ते घ्यावं, मग? यांना चांगलं कोण, वाईट कोण कळतंय् व्हय? मी यांना सांगितलंय की रस्त्यावर कोणाशीबी बोलायचं नाही. तुम्हीच यांच्याशी बोललात अन् कंपास बी दिलात! वळख ना पाळख. तुम्ही तरी यांना कशाला भुलवताजी आसं काही देऊन? सवय लागली की कोणाकडून काहीबी घेतील.’’ आजीबाई मनातलं सारंच बोलत होत्या अन् आमची वाचाच बंद होती.

‘‘ताई तुम्हीच सांगा, सगळी माणसं तुमच्यासारखी असतात व्हय? या लेकरांना चांगल्या वाईटाची अजून पारख नाय म्हणून त्यांना सांगावं लागतं. ताई मी अडाणी हाय, पण तुम्ही तर शिकल्या सवरलेल्या दिसता जी. तुम्हाले माझं सांगनं ठीक वाटतं न्हवं?’’ असं म्हणून त्या आजीने दोन्ही कंपासबॉक्स माझ्या हातात ठेवले व म्हणाली, ‘‘नाराज नका होऊ ताई. म्या बापजन्मात शाळा पाहिली नाय. पण या नाती शिकाव्या म्हणून रोज त्यांनला शाळेत सोडायला नि आणायला जाती. आठ दिवस हिची माय गावाला गेलती, म्हणून मले धाकटय़ासाठी घरी थांबावं लागलं. हिची माय आली अन् मी संग आलेच. चला गं पोरींनो.’’ आजी व नाती झपझप दिसेनाशा झाल्या.

मात्र शाळेत कधी न गेलेल्या त्या अशिक्षित आजीच्या तत्त्वज्ञानाच्या ओझ्याने माझी सुशिक्षित चाल मंदावली..

अनुपमा भेदी

bhedianupama@gmail.com