पावसाळा आला. सगळी झाडं सणासुदीला सजतात तशी सजली. रातराणीपण आता माझ्या बाल्कनीत स्थिरावू लागली. काही वर्षांनंतर नावडती सूनही घरचीच होते, तशी ती इतर कुंडय़ांत सामावून गेली. एक दिवस माझं लक्ष गेलं तिच्याकडं, तर माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसेना..

फ्लॅटच्या संस्कृतीत बाग लावणं म्हणजे फार कठीण काम! छोटय़ाशा बाल्कनीत कुंडय़ा लावून त्याला बाग म्हणायचं, पण झाडंफुलंप्रेमी हे कष्ट करून समाधान मानतात. आमच्या नव्या जागेत मी अशीच रोपे लावली होती. गुलाब, मोगरा, जास्वंदी, शेवंती आणि इतर शोभेची झाडं, बाल्कनी अगदी भरून गेली. दुधाची तहान ताकावर म्हणत मी बागेत रमून गेले.
आणि एक दिवस माझ्या मुलानं रातराणीचं रोप आणलं. ‘‘अरे, आता या रातराणीला जागा नाहीए. कशाला आणलंस ते?’’ माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यानं ते हट्टानं लावलं. मग मी ते जरा नाराजीनंच ठेवून घेतलं. जराही आकर्षकता तिच्यात नव्हती. पानं अगदी साधीच. रोपपण रानटी झाडासारखं वाटावं असं, पण तरी ठेवून दिली बाल्कनीतल्या कोपऱ्यात. जमलंच तरच माझ्याकडून तिला पाणी मिळू लागलं. ती फांदी कित्येक दिवस जशीच्या तशीच होती. माझं वागणं जणू तिच्या जिव्हारी लागून पाणी आणि खत तिच्या अंगीच लागत नव्हतं. माझा तिच्याविषयीचा राग वाढतच होता. कित्येक वेळा वाटायचं रातराणीनं उगीचच कुंडी अडवून ठेवली आहे, पण मुलाला वाईट वाटेल म्हणून तिला काढणं टाळलं. बाल्कनीतला कोपरा मिळूनही तिला माझ्या मनाचा कोपरा काही मिळाला नाही.
कालांतराने तिच्या फांद्या वाढू लागल्या, पण माझा राग जराही कमी झाला नाही. नुसत्याच फांद्या वाढतात, पण फुलांचा पत्ता नाही, म्हणून मला जाता-येता चिडायची सवयच लागली होती. पण हे म्हणायचे, ‘‘नसली फुलं तरी हिरवळ म्हणून राहू दे झाड.’’ यांना काय लागतं म्हणायला, कधी तांब्याभर पाणी तरी घातलंय का झाडांना? अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या मी एक दिवस रागारागानं कापून टाकल्या, पण या कापणीचा परिणाम उलटाच झाला. तिला अजूनच धुमारे फुटले. उलटून बोलणाऱ्या कार्टीसारखी ती अजूनच डवरली. काय ही वेडय़ासारखी दुश्मनी? मी मनाशीच हसले. शेवटी ठरवलं, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्षच करावं..
पावसाळा आला. सगळी झाडं सणासुदीला सजतात तशी सजली. रातराणीपण आता माझ्या बाल्कनीत स्थिरावू लागली. काही वर्षांनंतर नावडती सूनही घरचीच होते, तशी ती इतर कुंडय़ांत सामावून गेली. एक दिवस माझं लक्ष गेलं तिच्याकडं, तर माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसेना. तिच्याकडे प्रत्येक फांदीला भरगच्च कळ्यांचे घोस उगवले होते. ते कळ्यांचे झुबके पाहून माझा राग क्षणार्धात विरून गेला. तिचा कायापालट झाला. तिचं ते रूप पाहून मी हरवून गेले. जणू माझ्या सुनेला दिवस गेलेत. त्या कळ्या उमलून बाल्कनी सुगंधित होण्याची मी वाट पाहू लागले. तिला उचलून मी मध्यभागी आणली. छोटय़ा लोखंडी चौरंगावर ती विराजमान झाली. तिला मी सढळ हाताने पाणी, खत घालू लागले. कीडामुंगी लागू नये म्हणून काळजी घेऊ लागले. कुणी तरी काही तरी देणार म्हटल्यावर मनुष्य किती स्वार्थी होतो?
त्या गर्भिणीला आता कळ्यांचा भार सहन होईना. तिला मी आधार दिला. चौरंगावर ती आता मला सम्राज्ञीसारखी भासू लागली. जणू तिचं डोहाळेजेवण आयोजित केलं होतं. येणाऱ्या प्रत्येकाला माझ्याकडून होणारं कौतुक ऐकावं लागे. आमच्यातली रुष्टता संपून जिव्हाळ्याचं नातं बनलं.
आणि तो दिवस उजाडला. सारी संध्याकाळ सुगंधानं न्हाऊन निघाली. त्या दिवशी माझी रातराणी फुलली. असंख्य कळ्यांची फुलं झाली. कृतज्ञतेनं माझ्यावर सुगंधाचा वर्षांव करू लागली. याच रातराणीला मी कसं वागवलं होतं? त्याचा मागमूसही रातराणीला नव्हता. मुक्तहस्ते तिनं माझ्यावर प्रेमाची उधळण केली. जीवनात, सहवासात येणाऱ्या, ज्यांना आपण कमी लेखतो, सामान्य समजतो- तीच माणसं कधी कधी आपल्याला खूप काही देऊन जातात. हाच संदेश जणू मला त्या दिवशी रातराणीनं दिला होता. हा सुगंधी संदेश मला खूप काही शिकवून गेला, मूकपणे.
shobha.pingle@yahoo.com