आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्ती वेगवेगळे संस्कार करत जातात. त्यांच्या बोलण्या वागण्यातून आपणही घडत जातो. तसाच सहवास शकुंतला फडणीस यांना मिळाला सासूबाईं, जानकीबाई फडणीस यांचा. अर्थात शि. दं. च्या आईंचा. त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणारं हे शब्दचित्र.

शि. दं. ची आई म्हणजे माझ्या सासूबाई, जानकीबाई फडणीस! सासूबाईंना मी प्रथम पाहिलं त्या वेळी त्या साठीच्या जवळपास होत्या. त्यांना बघून माझ्या मनात पहिला विचार आला, ‘या वयात या इतक्या छान दिसताहेत, तरुण वयात किती सुंदर दिसत असतील!’ अन् काही दिवसांनी त्यांचा तरुण वयातला फोटोच बघायला मिळाला. भरजरी शालू, अंगभर दागदागिने, दंडात वाकी अन् चेहऱ्यावर अतिशय शांत,सात्त्विक भाव. सासूबाईंना सगळे जण काकू म्हणायचे. काकूंचा रंग गोरापान अन् डोळे निळसर होते. अंगानं लहान चणीच्या असणाऱ्या या बाईंचं आत्मिक बळ फार मोठं होतं. त्या बळावरच त्यांनी सगळ्या अडीअडचणींना धैर्यानं तोंड दिलं.
तरुण वयातच पती निधनाचा प्रसंग ओढवला. त्या वेळी त्यांचं वय होतं जेमतेम बत्तीस. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे काकूंना घरच्या आर्थिक परिस्थितीची काही म्हणजे काहीही माहिती नव्हती. पदरात चार मुलं. अशा वेळी थोरल्या दीर-जावेनं त्यांना खूप आधार दिला. दोघी जावाजावांचं बहिणीप्रमाणे प्रेम होतं. वैधव्याच्या दु:खातून काकू जरा सावरतात न सावरतात तोवर नवं संकट येऊन ठेपलं. मोठय़ा जाऊबाईंचंही आजारपणापुळे अकाली निधन झालं. त्या मुलांना आई नाही- या मुलांना वडील नाहीत. चमत्कारिक परिस्थिती ओढवली.
निपाणीजवळचं भोज हे आमचं मूळ गाव. तिथं आमची जमीन होती. घर होतं. गोकुळासारखं मोठं एकत्र कुटुंब होतं. सगळंच विस्कटून गेलं. मग यातून मार्ग निघाला तो असा. शेतजमिनीची व्यवस्था बघायला अण्णांनी- म्हणजे शिवबाच्या (शि. दं.च्या) चुलत्यांनी भोजेत राहायचं. सगळ्या सख्ख्या अन् चुलत भावंडांनी शिक्षणासाठी अन् त्यांना करून घालण्यासाठी म्हणून काकूंनी कोल्हापूरला राहायचं. स्वत:ची चार अन् जावेची पाच मुलं सांभाळायची- सोपं का होतं? पण काकूंनी ही जबाबदारी फार प्रेमानं आणि कसोशीनं पार पाडली. घरात वडीलधारं पुरुष माणूस कोणीही नाही. हाताखाली नोकरचाकर फारसे नाहीत. लग्नानंतरचं सर्व आयुष्य भोजेसारख्या खेडय़ात गेलेलं. आर्थिक स्वातंत्र्य तर त्या काळात स्त्रियांना नव्हतंच. कसं केलं असेल त्या वेळी काकूंनी?
स्वत:च्या मुलांचं तर आई प्रेमानं करतेच. पण आई वेगळी लेकरं म्हणून जावेच्या मुलांचं त्यांनी जास्तच प्रेमानं केलं. शिवाय त्यांची अन् जावेची, सगळीच मुलं त्यांना काकू म्हणायची. त्यामुळे सख्खं कोण अन् चुलत कोण हे पुष्कळांना कधी कळायचंच नाही. याबाबत सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या संदर्भातील आठवण मुद्दाम सांगण्यासारखी आहे. कोल्हापूरची जुनी ओळख- शिवाय सगळे फडणीसबंधूही संघवाले! बाबूजी पुण्याला आमच्याकडे कधी कधी यायचे. माझे थोरले दीर अप्पाराव आणि सुधीर फडके यांची खूप मैत्री. अप्पारावांच्या लग्नात बाबूजींनी मंगलाष्टकं म्हटली होती. पुढे श्रीधरच्या विवाहाचं निमंत्रण द्यायला ते आमच्याकडे आले होते. त्या वेळी त्यांनी आमच्या अन्य नातेवाइकांचे पत्ते विचारले. अप्पारावांचा पत्ता सांगताना शिवबांनी (शि. दं.नी) त्यांची आद्याक्षरं वाय. व्ही. अशी सांगितली. बाबूजी एकदम चकित! ते म्हणाले, ‘‘अरे, तू एस. डी. अन् अप्पा वाय. व्ही. कसा?’’
‘‘कसा म्हणजे काय? तो माझा चुलत भाऊ आहे.’’ शिवबांनी सांगितलं. त्यावर बाबूजी म्हणाले, ‘‘काय सांगतोस काय? किती वेळा मी तुमच्याकडे यायचो, कधी कधी राहायचो, पण तुम्ही चुलत भाऊ आहात हे मला आत्ता कळतंय!’’ काकू आणि अण्णा यांच्या नि:स्वार्थ, प्रेमळ वागणुकीमुळे चुलत या शब्दाला घरात कधी थाराच मिळाला नाही.
आमच्या धाकटय़ा बहिणीची पत्रिका कुठं पटत नव्हती. त्यामुळे तिचं लग्न जमण्यात अडचण येत होती. एके ठिकाणी पत्रिका पटली, पण बहिणीला तो मुलगाच पसंत नव्हता. आम्ही तिला समजुतीच्या गोष्टी सांगू लागलो. मुलगा खूप हुशार, होतकरू आहे, नोकरी चांगली आहे. तू आता नाही म्हणू नकोस वगैरे वगैरे. पण काकू म्हणाल्या, ‘‘अगं होईल तिचं लग्न. तुम्ही तिला नका आग्रह करू या स्थळाचा. ज्याच्याबरोबर जन्म काढायचा ते माणूसच आवडत नसेल तर संसार सुखाचा होईल का?’’
मी एकदम अवाक्! बहिणीचं लग्न वेळेवर व्हावं इतकाच आम्ही विचार केला होता. आम्ही सर्व भावंडं सुशिक्षित. पण बहिणीची मानसिकता आम्हाला कळलीच नाही! ती कळली चार यत्ता शिकलेल्या माझ्या सासूला! आणि खरोखरच बहिणीला मनापासून आवडलेल्या मुलाशी लौकरच तिचं लग्न झालंही.
माझं लेखन, आकाशवाणीवरचे कार्यक्रम, छोटय़ा मोठय़ा मंडळांतून होणारी भाषणं वगैरेचं काकूंना अप्रूप होतं. मला एखाद्या समारंभाला वगैरे जायचं असेल तर त्या वेळी त्या माझ्यासाठी फुलांचा गजरा किंवा अबोलीची वेणी करून द्यायच्या. आता मी सासूबाईंचं एवढं गुणवर्णन करतेय, म्हणजे आमच्या कधी तक्रारी नव्हत्याच की काय? व्हायच्या ना. कधी कधी तक्रारी जरूर व्हायच्या. पण त्या अगदी किरकोळ असायच्या. अन् मुख्य म्हणजे लगेच मिटायच्या.
एकदा मी लेखन-मानधनाच्या पैशातून त्यांच्यासाठी साडी आणली होती. ते त्या कौतुकानं सर्वाना सांगायच्या. पण मला खरा आनंद झाला तो त्यांची काशी यात्रा झाली तेव्हा. काशी यात्रा घडावी, अशी त्यांची फार इच्छा होती. ती पूर्ण करावी, असं मला मनापासून वाटलं. मग मी त्यांच्या प्रवासाची जय्यत तयारी करून दिली. काकूंनी आयुष्यभर सर्वासाठी खूप काही केलं. ‘काशीस जावे नित्य वदावे.’, असं त्या म्हणायच्या. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. काकूंची काशी यात्रा उत्तम प्रकारे पार पडली. याचा मला खूप आनंद झाला.
एक गमतीचा योगायोग म्हणजे काकू माहेरच्या बापट आणि मीसुद्धा माहेरची बापट! शि. दं.चं. शिवबा हे घरगुती नावं काकूंनीच ठेवलं होतं. मुंबईला शिकायला असताना. उन्हाळ्यात घरी ढिगानं आंबे असायचे. सर्व जण आंब्यांवर ताव मारायचे. पण शिवबांचं खाणं मुळातच कमी. आंबेही ते मोजकेच खायचे. मग चार-सहा दिवस आधी दोन्ही वेळच्या जेवणानंतर, काकू शिवबांच्या नावाचा एकेक आंबा बाजूला काढून ठेवायच्या अन् त्या आंब्याच्या वडय़ा करून बरोबर द्यायच्या.
काकू एकदा मला सांगत होत्या, ‘इतकी मुलं मी वाढवली पण कधीही मुलांवर ओरडले नाही की हलकीशी चापटसुद्धा मारली नाही. तरी सगळी मुलं गुणी निघाली!’ सगळी मुलं चांगली निघाली हे शंभर टक्के सत्य. पण मुलांवर कधी साधं ओरडणंसुद्धा नाही? आठ- नऊ मुलांचा दंगा, भांडणं, खाण्या-पिण्यावरून तक्रारी, एकमेकांचे कपडे किंवा पांघरूण पळवणं, खोडय़ा काढणं, हे सगळं घरात होतंच असेल ना? तरी काकू शांत? मला काही हे खरं वाटेना. पण आईच्या म्हणण्याला स्वत: शिवबांनीच दुजोरा दिला. म्हणाले, ‘अगं खरंच! काकू आमच्यावर कधी रागावलीय किंवा ओरडलीय, असं मला तर आठवतसुद्धा नाही!’’ हे सगळं ऐकून मी अगदी थक्क झाले. मुलींची गोष्ट वेगळी. पण मुलग्यांना वळण लावायची जबाबदारी घ्यायला घरात वडीलधारं पुरुष माणूस नाही. तेही काम काकूंनीच पार पाडलं! मुलांवर न रागावता!
‘हसरी गॅलरी’ हे आमचं प्रदर्शन खूपच गाजलं. पहिलं प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीत झालं. (फेब्रुवारी १९६५) काकूंचा त्या वेळी आमच्याकडेच मुक्काम होता. दिवसभर रोजची कामं करून, रात्री जागून, आम्ही दोघं प्रदर्शनाची तयारी करत असू. एकदा रात्री आम्ही सुरुवात केली, त्यात इतके मग्न झालो की वेळेचं भानच राहिलं नाही! भान आलं काकूंच्या शब्दांनी. त्या हलकेच तिथं आल्या अन् म्हणाल्या, ‘अरे, किती वेळ काम करताय? लक्ष आहे का तुमचं? बाहेर उन्हं आली आहेत!’ ते पहिलंच प्रदर्शन खूप गाजलं, वृत्तपत्रांतून फोटो, मुलाखती, प्रेक्षकांची गर्दी, चित्रांचं अन् चित्रकाराचं कौतुक सगळं बघून काकू मनोमन खूप सुखावल्या.
प्रदर्शन यशस्वी झालं या आनंदात शिवबांनी सगळ्यांना छान छान भेटवस्तू दिल्या. मला? काहीच नाही. पण काकू म्हणाल्या, ‘‘अरे, प्रदर्शनाचं इतकं काम ती करत होती. तिला चांगलीशी साडी घे ना’’ मग मात्र शिवबांनी मला मोत्यांची सुरेख माळ घेऊन दिली. मीही त्यांना छानसा शर्ट घेतला. हे घडलं काकूंनी सांगितल्यामुळे!
काकूंची चण लहान होती, पण प्रकृती काटक होती. पंचाहत्तर वयाच्या मानाने तब्येत चांगली होती. अनायासे मरण यावं, माझं कुणाला करावं लागू नये, असं त्या म्हणायच्या. तसंच घडलं. पण फार चमत्कारिक प्रकारे. काकूंची मोठी बहीण आजारी पडली. बहिणीला बघायला म्हणून काकू बहिणीकडे कराडला गेल्या अन् स्वत:च आजारी पडल्या! दोनच दिवसांचं आजारपण. तिसरे दिवशी सगळं संपलं! आमच्या मावसजावांनी दोन दिवस काकूंची खूप सेवा-शुश्रूषा केली. पण स्वत: काकूंची मुलं, लेकी, सुना कोणी कोणी शेवटी जवळ नव्हतं!
ही १९७२ ची घटना. त्या वेळी आजच्याप्रमाणे फोनच्या सुविधा नव्हत्या. ट्रंक कॉल तर फारच कठीण, त्रासदायक होता. शिवाय कराडच्या घरात काकूंची बहीणही आधीपासून आजारी. आम्हीच त्यातल्या त्यात जवळ होतो. आजारी काकूंना बघायला म्हणून शिवबा कराडला गेले तर काकूंचं अंत्यदर्शनच घ्यायची वेळ आली! शिक्षण, नोकरी व्यवसाय, यामुळे जो मुलगा आईपासून बरेचदा लांब राहिला, तो एकटाच त्या वेळी आईजवळ होता! हाही वेगळाच योगायोग!
आजच्या अंकात डॉ. हरीश शेट्टी
यांचे ‘कुमार संभव’ हे सदर
प्रसिद्ध झालेले नाही.

bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
bigg boss fame ruchira jadhav bought new house
स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर, दारावरच्या पाटीवर लावलं आई-बाबांचं नाव, फोटो शेअर करत म्हणाली…
arbaaz khan sohail khan on relationships
“एका ठराविक काळानंतर…”, अरबाज खानचं नात्यांबद्दल स्पष्ट मत; सोहेल खान म्हणाला, “एखाद्याचा इगो दुखावणं…”