तो महिना-दीड महिन्याचा काळ ईशानसाठी त्याच्या इवल्याशा आयुष्यात फार वेगळा, दुसऱ्या टोकाचा होता. मुख्य म्हणजे या काळात आई-आजीची,

आई-बाबांची भांडणंदेखील होत नव्हती! त्याच्या बालमनाला प्रश्न पडला, ‘ही मोठी माणसं एरवी अशी का वागत नाहीत?’

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!

‘‘वेगळं व्हायचा निर्णय नक्की कुणी घेतला?’’

‘‘आम्ही दोघांनी!’’ सलील आणि स्वाती दोघंही एकदम उत्तरले.

‘‘ईशान जेमतेम तीन वर्षांचा आहे. त्याला आजी-आजोबांचा कितपत लळा आहे?’’

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. ‘‘भरपूर! आजी आजोबांचाच नव्हे तर मोठय़ा आजीचादेखील आहे. ती व्हील-चेअरवर असली तरी त्याची तिच्याशीदेखील गट्टी असते.. ‘मोठय़ा आजीच्या गोष्टी’ असतात. रात्री बहुतेक तो आजी-आजोबांच्या जवळच झोपतो..’’ थोडं थांबून सलील हळवा होत म्हणाला, ‘‘मीदेखील माझ्या लहानपणी आजी-आजोबांच्या जवळ झोपायचो. मला आठवीपर्यंत आजोबा होते. आज नव्वदीतली आजी मला आहे.. कामावरून आल्यावर मी खाली आजीला भेटल्याशिवाय वर जात नाही.’’

‘‘सलील, आज तुला एवढं जाणवत असेल, तर वेगळं राहिल्यावर आजी-आजोबा, मोठी आजीपासून दुरावल्यामुळे, ईशानवर गंभीर परिणाम होऊ शकेल, असं नाही वाटत? समजा ईशाननं रात्री-अपरात्री आजी-आजोबांसाठी हट्ट धरला, रडून आकांत केला तर? इतक्या लहान वयात मुलांच्या मानसिकतेवर अशा गोष्टींचा खोलवर परिणाम होत असतो. त्यांना सगळं समजलं नाही तरी, अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा अंदाज येत असतो. काही मुलं कुढी होत जातात, काही कोषात जातात, काही आक्रमक होतात.’’

‘‘याचीदेखील कल्पना आहे, काका. माझ्या लहानपणीदेखील आई अन् आजीचे वाद व्हायचे. घरात ताण-तणाव असायचा. अशा वेळी मी घाबरून जायचो, एकटा कुढत बसायचो. बरोबर कोण, चुकीचं कोण, हे कळायचं वय नव्हतं. पण आजीविषयी सॉफ्टकॉर्नर असायचा, आजोबांचा आधार वाटायचा. आजी आजोबांच्या सहवासातलं माझं बालपण नक्कीच निर्भय, आनंदाचं होतं!’’

‘‘ईशानला तसं बालपण तुम्ही नाकारताय असं नाही वाटत?’’

‘‘तसं असेलही, काका. पण सध्या तरी स्वाती अन् आईचे बरेचदा, अगदी क्षुल्लक कारणावरून, होणारे वादविवाद, भांडणं, आता मला अस झालीत.. याला मी ‘जनरेशन गॅप’ असंदेखील म्हणणार नाही. कारण स्वातीचं तिच्या आजेसासूशी चांगलं पटतं! आजीच्या जुन्या माहेरच्या गप्पागोष्टी, तिच्या लग्नानंतर तिच्या सासूशी असलेल्या नात्यातले ताणतणाव, यातून झालेला संसार, नंतर सुनेशी झालेले वावविवाद, जे आजोबा गेल्यानंतरच संपले.. पण या साऱ्यातून ती स्वातीला बरंच काही सुचवत असते. मात्र या सासू-सुनांच्या प्रत्यक्ष भांडणाच्या वेळी आजी तिच्या खोलीत दरवाजा लोटून शांत बसते.. पण मनातून अस्वस्थ असते. अन या दोघींना शांत करता करता माझी कात्री होते. नंतर आम्हा दोघांच्यात भांडणं टोकाला जातात. याचा माझ्या कामावर, प्रकृतीवर परिणाम व्हायला लागलाय. स्वातीच्याही तब्येतीवर परिणाम होतोय.. असा संसार कुठवर करणार, काका? आम्ही असं आयुष्य नाही काढू शकत.’’

‘‘या सगळ्यांत, आपण आपापले ‘अहं’ प्रमाणाबाहेर जपतोय, ईशानवर अन्याय करतोय असं नाही वाटत? तो इतका लहान आहे, त्याला काय कळतंय, असं म्हणून त्याला आपण गृहीत धरतोय, असं तर नाही? समजा काही कारणाने ईशानसाठी पुन्हा बंगल्यावर राहायला जायची वेळ आली तर, मनात कुठलीही अढी न ठेवता, ‘अहं’ न दुखावता, मोकळ्या मनानं जाल? अन् तसं होणार नसेल तर आजच आपण आपले अहं बाजूला का नाही ठेवत?  अहं तर प्रत्येकालाच असतो. हा अहं प्रमाणाबाहेर वाढत गेला की, नातीगोती त्यात वाहून जातात.’’

‘‘पटतंय, काका पण.. आम्हाला आमचं आयुष्य मोकळेपणी जगायला द्यायला नको का त्यांनी? अन् खरं सांगू, भविष्याचा इतका विचार नाही केलाय आज, काका. तेव्हाचं तेव्हा बघू.’’

सलीलच्या बाबांनी एकत्र राहण्यासाठी पुण्यात बांधलेलं, हे दुमजली छोटंसं घर! सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या चर्चेचा ‘तेव्हाचं तेव्हा बघू’ हा निष्कर्ष होता. भविष्यावर सोपवलेला!

‘सलील वेगळा होतोय’ असं त्याच्या बाबांकडून समजल्यावर, दुसरी बाजू समजून घेण्याचा तो प्रयत्न होता. ही दुसरी बाजूदेखील तितकीच महत्त्वाची होती. अखेरीस एकच गोष्ट अधोरेखीत झाली.. दोष कुणाचा हा मुद्दा नसतो, ‘जनरेशन गॅप’हादेखील मुद्दा नसतो. तर फक्त ‘मी, माझे, मला..’ हा अट्टहास असतो. आपापला ‘अवकाश’ जपताना दुसऱ्याला ‘समजून घेण्याच्या’ अभावामुळे.. नात्यागोत्यात न बुजवता येणाऱ्या दऱ्या निर्माण होतात!

अहंमन्य, अहंकार वगैरे शब्द ज्या ‘अहम्’मधून निर्माण झाले, तो ‘अहम्’ म्हणजे कधीही न जाणारा इ‘गो’! माणसाइतकाच जुना असलेला हा रोग.. ‘इगो’! या रोगाकडे दुर्लक्ष करणं जमलं पाहिजे. प्रमाणाबाहेर जपला की या ‘इगो’ची माणसातली रक्ताची अन् जोडलेली नाती तोडण्यापर्यंत मजल जाते! अन् जेव्हा जाणीव होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आई-वडिलांच्या भूमिकेतून सासू-सासऱ्याच्या भूमिकेत शिरताना-रूळ बदलताना- होणारं घर्षण तर अटळच. त्यानंतर तरी प्रवास सुरळीत व्हावा? तसं सहसा घडत नाही. काही अधिकार नव्या पिढीवर सोडून अंशत: निवृत्त होणं, हे तर भल्याभल्यांना जमत नाही. मग घरात आलेल्या नव्या सुनेकडून, ‘आईची सासू’ होताना किती आणि कोणत्या अपेक्षा असाव्यात यालादेखील काही मर्यादा राहत नाहीत. मग अशी तुटलेली नाती, दुभंगलेली घरं, वेळीच टाके न घातल्यामुळे मनं उसवलेली माणसं, आपल्या अवतीभोवती आज दिसून येतात!

सलील-स्वाती हे ईशानला घेऊन वेगळं राहायला लागल्यावर, पंधरा दिवसांतच मोठय़ा आजीने गलितगात्र झाल्याप्रमाणे व्हील-चेअर सोडून कायमचं अंथरुण धरलं. नवा आजार काहीच नव्हता. शरीर थकलेलं. मन त्याहूनही थकलेलं. नंतरच्या महिन्याभरात सलील-स्वाती-ईशानच्या बंगल्यावर फेऱ्या वाढल्या. आल्याआल्या मोठय़ा आजीच्या खोलीत धावणारा ईशान त्या खोलीच्या बाहेर पडेना. आता तो मोठय़ा आजीच्या व्हील-चेअरवर बसून, मोठय़ा आजीनेच सांगितलेल्या गोष्टी त्याच्या बोबड-भाषेत तिला उठवण्यासाठी सांगू लागला! ग्लानीत असलेली मोठी आजी डोळे थोडाफार उघडायची, हसायची.. पण बोलण्याची शक्ती नसायची. एरवी चळवळ्या असणारा ईशान आता कळत-नकळत शांत झाला. महिन्याभरात ईशानची ही मोठी आजी ‘देवाघरी’ गेली! ‘मोठय़ा आजीला कुठे नेलं’, या त्याच्या प्रश्नावर त्याला पटेल असं, या पेक्षा वेगळं उत्तर, कुणाकडेच नव्हतं! तो घरातल्या देवघरासमोर उगाचच रेंगाळू लागला.

नंतरच्या पंधरा दिवसांत कुठूनकुठून भेटायला येणारी माणसं, होणारी बोलणी.. ईशान या सर्वात हरवल्यासारखा होता. त्याच्या जगातलं एक महत्त्वाचं माणूस आता कायमचं निघून गेलं होतं. त्याच्या आजीनं त्याला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना गोष्ट सांगणं किती अवघड असतं, हे आजोबांनादेखील कळून चुकलं! हा महिना-दीड महिन्याचा काळ त्याच्यासाठी त्याच्या इवल्याशा आयुष्यात फार वेगळा, दुसऱ्या टोकाचा होता. मुख्य म्हणजे या काळात आई-आजीची, आई-बाबांची भांडणंदेखील होत नव्हती! त्याच्या बालमनाला प्रश्न पडला, ही मोठी माणसं एरवी अशी का वागत नाहीत?

एक दिवस न राहवून त्याने आजीच्या गळ्यात हात टाकत प्रश्न केला, ‘‘आज्जी, आमी आता इथंच लाहू?’’ तीन वर्षांच्या नातवाचा हा अगतिक प्रश्न ऐकून, आजीच्या डोळ्याला धारा लागल्या. हमसून रडत, त्याला घट्ट कवटाळत, त्याचे मुके घेत आजी म्हणाली, ‘‘राजा, आता तू कुठेही जाणार नाहीस!’’

मोठय़ा आजीने जाताजाता मोठा प्रश्न सोडवला. आपली माणसं जवळ असली पाहिजेत या अनुभवाने, एकमेकांशी ‘संवाद’ साधत, चौघांनी एकत्र बसून काही निर्णय घेतले.. कुणाचेही ‘अहम्’आड न येता! ईशानच्या एका प्रश्नामुळे हे शक्य झालं! त्या घरात आता खालच्या मजल्यावरची मोठय़ा आजीची खोली, आता आजी-आजोबांची झालीय. वरच्या मजल्यावर सलील-स्वाती राहतात. वरच्या मजल्यासाठी जिन्यातून वेगळा प्रवेश अन् दोन्ही मजल्यावर वेगवेगळी स्वयंपाकघरं झाली असली तरी, ईशानसाठी हे घर एकच होतं. त्याच्या लहरीनुसार तो आता कुठेही राहतो, झोपतो, बागडतो.. मुक्तपणे!

प्रभाकर बोकील

pbbokil@rediffmail.com