साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सदानंद देशमुख लिखित ‘बारोमास’ या कादंबरीवर आधरित हिंदी चित्रपटाची निवड वॉशिंग्टन येथे होणाऱ्या ‘डीसी इन्डिेपेन्डन्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये करण्यात आली आहे. ६ ते १० मार्च या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात ‘बारोमास’ या चित्रपटाचा खेळ रंगणार आहे.
महोत्सवात निवड झालेला हा एकमेव भारतीय चित्रपट असून ‘फिचर फिल्म’ विभागात अमेरिका, युरोप, कॅनडा, स्विर्झलडमधून आलेल्या चित्रपटांबरोबर ‘बारोमास’ स्पर्धेत असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते पालिप्पुरम साजिथ यांनी दिली आहे. या चित्रपटाची पटकथा महोत्सवातील परिक्षकांना आवडली असून बेंजामिन गिलानी आणि सीमा विश्वास यांच्या अभिनयातून चित्रपटाचा विचार थेट भिडतो, अशा शब्दांत चित्रपटाचे कौतुक करण्यात आल्याचेही पालिप्पुरम यांनी सांगितले.
मूळ विदर्भाचे असलेल्या सदानंद देशमुख यांनी शेतक ऱ्यांची दुख, त्यांचे जगणे जवळून अनुभवले आहे. त्याचे यथार्थ चित्रण या ‘बारोमास’ कादंबरीत उमटले आहे. त्यांच्या कादंबरीवरील या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूटमधून पदवी घेतलेल्या धीरज मेश्राम याने केले आहे. अमरावती जिल्ह्यातील एका खेडय़ात या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. याआधी न्यूयॉर्कमधील दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवातही ‘बारोमास’ची निवड करण्यात आली होती. वॉशिंग्टन येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवात धीरज मेश्राम उपस्थित राहणार असून तेथील चर्चासत्रातही ते सहभागी होणार आहेत.