१०० कोटी, २०० कोटी, ५०० कोटी.. अशा आकडय़ांच्या गल्लाभरू चित्रपटांच्या मागे लागून निर्माते भारंभार चित्रपट काढत असून शतकाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या चित्रपट उद्योगाची कडेलोट होण्याची वेळ नजीक आली असल्याचे गंभीर भाकीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले आहे.
येथे आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शेखर कपूर यांनी हे भाष्य केले आहे. चित्रपट दिग्दर्शक व निर्माते अनुराग कश्यप यांनीही शेखर कपूर यांच्या भाकिताला गांभीर्याने घेण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट करत भारंभार हिंदी चित्रपटांमुळे प्रादेशिक चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे नमूद केले. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाच्या वेळचा अनुभव शेखर कपूर यांनी यावेळी सांगितला. त्यावेळी आपण या चित्रपटाच्या ३५० प्रती देशभरातील चित्रपटगृहांमध्ये झळकवण्यासाठी काढल्या होत्या. त्यावेळी सिनेसृष्टीतील सर्वानी  वेडय़ात काढले. मात्र, आता हाच ट्रेण्ड बदलला असल्याचे ते म्हणाले.