काही वर्षांमागे विनय आपटय़ांचं (प्र. ल. मयेकरलिखित) ‘रानभूल’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही लाभला होता. मराठी रंगभूमीवर सध्या ‘जुनं ते सोनं’ला आलेली नवी झळाळी पाहता याही नाटकाला पुनश्च प्रकाश दिसल्यास नवल नव्हतं. सर्वसामान्य प्रेक्षकाला खिळवून rv11ठेवण्याची किमया या नाटकात नक्कीच आहे. मिट्ट काळ्या रंगातली खलनायकी पात्रं, त्यांच्या मगरमिठीत सापडलेली गरीब बिचारी निरागस नायिका आणि रॉबिनहुडछाप नायक यांचं उकळतं रसायन जमून आल्यावर प्रेक्षकाला आणखीन काय हवं? पुन्हा फिरत्या रंगमंचाची खुमारी हे जास्तीचं आकर्षण आहेच!
..तर हे रसायन याही पुनरुज्जीवित ‘रानभूल’मध्ये जमून आलेलं आहेच. यातले कलाकारही त्याच तीव्रतेनं हा मेलोड्रामा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. परंतु काळाचा एक मोठा तुकडा दरम्यानच्या काळात मागे पडलेला असल्यानं आणि प्रेक्षक म्हणून आपणही थोडेसे अधिक पक्व झालेलो असल्यानं आज या नाटकातले दोष म्हणा, उणिवा म्हणा- प्रकर्षांनं जाणवतात. ‘रानभूल’मध्ये तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’मधल्या पात्रांसारखीच गिधाडी वृत्तीची माणसं आहेत. परंतु त्यांना त्यांची अशी काही ‘भूमी’च नाहीए, ही अडचण आहे. ही माणसं नाटक-सिनेमासारख्या संवेदनशील कलेशी निगडित आहेत असं सुरुवातीच्या त्यांच्या बोलण्यातून कळतं. त्यापैकी दयाळ नावाच्या गावाकडच्या एका माणसानं सिनेमाच्या वेडापायी आपलं घरदार गहाण टाकून काढलेला सिनेमा पार झोपल्यानं तो भिकेकंगाल झालाय. त्याच्या सिनेमातली नायिका प्रिया (जिच्याशी त्यानं गावाकडे बायको-पोरं असतानाही लग्न केलंय.) पिक्चर आपटताच त्याला टाटा.. बाय बाय करून नट राजनशी सूत जुळवते. दयाळचा मुंबईतला आलिशान फ्लॅट लेखक नानासाहेब सरंजामे आणि राजनने कुटील नीतीनं हडपलाय. दारूच्या पूर्णपणे आहारी गेलेला दयाळ आश्रितासारखा आता चार घोट दारूसाठी त्यांच्यापाशी लाचार झालाय. त्यांच्या नाटकांचे प्रयोग सुरू असले तरी कर्जाच्या ओझ्याखाली तेही पिचलेत. यावर जालीम उपाय म्हणून मीता नावाच्या एका गावाकडल्या मुलीला राजन कलाक्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न दाखवून नादी लावतो आणि तिला आपल्याबरोबर पळून यायला उद्युक्त करतो. ती श्रीमंत बापाची लेक असल्यानं सोबत दागदागिने, पैका घेऊन येणारच, ही त्यांना खात्री असते. तसंच घडतं. राजनच्या भरवशावर मीता घरचे दागदागिने घेऊन पळून येते. तिच्या रूपानं सोन्याची अंडी देणारी कोंबडीच आपल्या हाती गवसलीय, आता ब्लॅकमेल करून तिच्या बापाकडून पैसा उकळायचा असा त्यांचा बेत असतो. त्याकरता दयाळचा मीताच्या हातून खून झाल्याचा बनाव रचण्यात येतो. त्यास मीता बळी पडते. आपल्या हातून खरोखरच दयाळचा खून झालाय असं ती समजते. पुढल्या अंधाऱ्या भवितव्याच्या कल्पनेनं ती प्रचंड हादरते. राजन आणि कंपनी मग तिला यातून वाचविण्याच्या बहाण्यानं त्यात अधिकच अडकवतात. अगदी ती भ्रमिष्ट होईल असं पाहतात.
इकडे दयाळचाही परस्पर काटा काढण्याच्या इराद्यानं ते त्याला एका इस्पितळात डॉक्टरांकरवी डांबून आपल्या मार्गातला तोही काटा दूर करतात.
परंतु एक गडबड होते. दयाळचा गावाकडचा टपोरी मुलगा रंगा अकस्मात तिथं उपटतो. त्याला तिथं काहीतरी भलतं शिजतंय याचा वास लागतो. बापाच्या व्यसनापायी आणि बाहेरख्यालीमुळे देशोधडीला लागलेलं आपलं कुटुंब सावरता सावरता त्याच्या नाकी नऊ आलेयत. बाप जिवंत आहे की मेलाय, याच्याशी त्याला काहीच देणंघेणं नाहीए. पण राजन आणि कंपनीला धमकावून त्यांच्याकडून काही उकळता येतं का, हे पाहण्यासाठी तो आलाय. हळूहळू तिथं काय घडलंय, हे त्याला आकळत जातं, तसा तोही या ब्लॅकमेलच्या खेळात आपला बरोबरीचा हिस्सा मागतो. सुरुवातीला त्याला झुरळासारखं झटकू बघणारे राजन, नाना आणि प्रिया हा आपल्याला गोत्यात आणू शकतो हे जाणवल्यावर त्यालाही आपल्यात सामील करून घेतात. मीताला रंगा आधीच ओळखत असतो. त्याच्या गावातल्याच बडय़ा घरची मुलगी असते ना ती! आपल्या ‘गरिबी हटाव’ मोहिमेवरचा हा जालीम उपाय त्यालाही रुचतो. तो त्या तिघा कसायांना सामील होतो..
रक्ताला चटावलेले राजन, प्रिया आणि नाना हे नरभक्षक मीताचं नेमकं काय करतात? त्यांचं ईप्सित साध्य होतं? रंगा त्यांना मदत करतो?.. अशा बऱ्याच प्रश्नांच्या गुंतवळीची उत्तरं नाटकात यथावकाश मिळत जातात.
हे जरी खरं असलं तरी हे तद्दन बेतलेलं नाटक आहे हे पडदा उघडताक्षणीच लक्षात येतं. त्याचं कारण- राजन, दयाळ, नाना आणि प्रिया यांच्यातला ‘प्रेमळ’ संवाद! परंतु त्यांच्यात नेमका काय तिढा आहे याचा शेवटपर्यंत थांग लागत नाही. कारण यातल्या या पात्रांना त्यांची अशी ‘भूमी’च नाहीए. ती उपटसुंभांसारखी उगवली आहेत. त्यांचे परस्परसंबंध तसे का आहेत, हे उकलून दाखवायची गरज ना लेखकाला वाटलीय, ना दिग्दर्शकाला! म्हणजे एकीकडे यातली पात्रं संवेदनशील नाटकं वगैरे करतात, त्याचवेळी दुसरीकडे मीतासारखी सावजं गळाला लावण्याचे उद्योगही करतात. यामागचं प्रयोजन उलगडत नाही. कुठल्या कम्पल्शन्समुळे त्यांना हे करावं लागतंय, हे शेवटपर्यंत कळत नाही. ही माणसं मूलत:च सैतानी प्रवृत्तीची आहेत असं म्हणावं, तर मगनलालचं कर्जही ती फेडताना दिसतात. दयाळला दारचा कुत्रा म्हणून का होईना, त्यांनी घरातच पाळलंय. ते का? याचंही समर्पक उत्तर सापडत नाही. रंगा या सर्व चोरांवर मोर होऊन त्यांना पुरून उरतो.
थोडक्यात : इथं कसलेही तार्किक प्रश्न उपस्थित करण्याची सोय नाही. दिग्दर्शक मंगेश कदम यांनीही याबाबतीत अळीमिळी गुपचिळी स्वीकारली आहे. त्यांना ‘रानभूल’मधील नाटय़पूर्णता भावलेली दिसते. अर्थात सतत ‘पुढं काय होणार?’ची उत्सुकताच प्रेक्षकांना नाटकाशी खिळवून ठेवते. कथानकाच्या तार्किकतेकडे मग त्यांचं दुर्लक्ष होतं. घटना-प्रसंगांतली नाटय़पूर्णता, शह-काटशहाची धुमश्चक्री यांच्या कोलाहलात रंगाच्या अंतर्मनातला प्राप्त परिस्थितीविषयाचा आक्रोश आणि मीतामध्ये त्याचं नकळत गुंतत जाणं.. नाटकाला भावुकतेची एक अलवार किनार देऊन जातं. नाटक प्रेक्षकाला खिळवतं, ते इथं. कलाकारांकडून आपल्याला हवं ते काढून घेण्यात मंगेश कदम यशस्वी झाले आहेत. नाटकाचा सतत वर जाणारा टेम्पो आणि उत्तरोत्तर वाढती उत्कंठा त्यांनी टिकवून ठेवली आहे. प्रकाश मयेकरांच्या फिरत्या नेपथ्यानं निरनिराळ्या स्थळी घडणारं हे नाटय़ समूर्त करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. प्रकाशयोजक संजय जाधव यांनी हे नाटय़ खुलविण्याची आणि अवधूत गुप्ते यांच्या आघाती संगीतानं नाटय़ांतर्गत ताण वाढविण्याची कामगिरी चोख बजावली आहे. मुक्ता बर्वेनी वेशभूषेतून पात्रांना व्यक्तिमत्त्व बहालं केलं आहे.
यातल्या रंगाच्या भावखाऊ भूमिकेत संजय नार्वेकरांनी संवादफेकीवरील आपल्या हुकुमतीनं अधिराज्य गाजवलं आहे. एन्ट्री-एक्झिटचं जबरदस्त टायमिंग आणि त्याद्वारे ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रभाव पाडणं- त्यांच्याइतकं कुणाला जमणं अवघड. कधी नव्हे ते, ते या नाटकात संयतपणे पेश आले आहेत. रंगाचं अंतरंग त्यांना नीटच गवसलं आहे. भाऊ कदम यांचा दयाळ ‘लव्हेबल रास्कल’ या प्रकारात मोडणारा. त्यांना आपल्या बलस्थानांची पुरेपूर जाणीव दिसली. नंदिनी वैद्य यांनीही पाताळयंत्री प्रिया तिच्या तिखट नखऱ्यांनिशी साकारलीय. राजनची खलनायकी कुटीलता मिलिंद सफई यांनी संवादोच्चारांतील बेगडीपणातून व्यवस्थित दर्शविली आहे. नाना झालेले विजय पटवर्धन अपंगत्वातही पशुता जोपासून असल्याचं त्यांच्या मुद्राभिनयातून अधोरेखित होतं. मीताच्या भूमिकेतील पूजा ठोंबरे हे या नाटकाचं नवं ‘फाइंड’ म्हणायला हरकत नाही. त्यांच्या भावस्पर्शी चेहऱ्याद्वारे मीताच्या अंतर्मनीची खळबळ बोलकी होते. व्यावसायिक रंगभूमीला एक नवी आश्वासक कलावंत त्यांच्या रूपानं येत्या काळात मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.  विनय आपटेंच्या ‘रानभूल’ची भूल कायम राखणारं; मात्र पात्रांच्या ‘भूमी’बद्दल सकारण प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे नाटक सुरुवात वगळता कलावंतांच्या चोख कामगिरीमुळे प्रेक्षणीय झालेलं आहे.  

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral