संध्याकाळ झाली की पाखरं घराकडे परततातच, असं म्हणतात. सध्या टीव्हीवरही असंच काहीसं होताना दिसतंय. टीव्हीमधून घडलेल्या अनेक पाखरांना पंखात बळ आल्यावर बॉलीवूडचं क्षितिज खुणावू लागतं आणि ते त्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न करतात. आता प्रत्येक जण शाहरुख खान नसतो. त्यामुळे पंखातली ताकद संपली की ही पाखरं पुन्हा आपल्या घरटय़ाकडे परततात. टीव्हीच्या बाबतीत हे चक्र नेहमीचंच आहे. सध्याही टीव्हीवर नव्याने येणाऱ्या चेहऱ्यांसोबतच या परतणाऱ्या पाखरांची चर्चाही रंगू लागली आहे.rv17
टीव्हीसम्राज्ञी एकता कपूरने तिच्या मालिकांमधून तरुणाईला अशा अनेक जोडय़ा दिल्या, ज्यांच्या प्रेमाच्या आणाभाका तरुणाई सतत घेत असे. त्यातील एक म्हणजे राजीव खंडेलवाल आणि आमना शरीफ, दुसरी कृतिका काम्रा आणि करण कुंद्रा. स्वर्गात देव तर जमिनीवर एकताच अशा जोडय़ा बनवू शकते याची खात्री पटावी अशा या जोडय़ा. पण मालिका संपल्यावर या जोडय़ाही वेगळ्या झाल्या. त्यानंतर राजीव-आमनाने बॉलीवूडमध्ये जाण्यासाठी बरीच धडपड केली. ‘आमीर’सारख्या चित्रपटातून राजीवने समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून अभिनयासाठी कौतुकाची थाप मिळविली. पण तिकीटबारीवर यश मिळवता आलं नाही. आमना तर बॉलीवूडमध्ये सपशेल अपयशी ठरली. त्यानंतर तिने टीव्हीवर येण्याचा प्रयत्नही केला. पण तिथेही पूर्वीसारखं यश आलं नाही. आता राजीवही आपली टीव्हीवरची कारकीर्द नव्याने सुरू करण्यासाठी धडपडतो आहे. ‘रिपोर्टर्स’ या सिरीजमधून तो परतत आहे. या वेळी त्याच्यासोबत कृतिका मालिकेत असणार आहे. कृतिकाने ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेनंतर चित्रपट करण्याऐवजी सूत्रसंचालन करणं पसंत केलं होतं. पण आता तीही मालिकांमधून परतत आहे. मालिकांच्या क्षेत्रातील अजून एक मोठं नाव म्हणजे राम कपूर. रामला ओळख त्याच्या मालिकांमुळे मिळाली. ‘बडे अच्छे लगते हैं’नंतर त्याला अनेक चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली. त्या मालिकेच्या दरम्यानच त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी त्याच्या तारखांची इतर कलाकारांच्या तारखांशी जुळवाजुळव करताकरता निर्मात्यांच्या नाकी नऊ आले होते. लवकरच तो ‘दिल की बातें दिल ही जाने’ या मालिकेतून परत आला आहे. रामची बायको गौतमीही rv19मालिकांमध्ये  परतली आहे. आतापर्यंत मालिकेत तिला मॉडर्न आईच्या लुकमध्ये दाखवलं होतं. पण बनारसमध्ये राहायला गेल्यामुळे तिला परत साडीमधील करुणामय आई बनावं लागलंय. ‘प्यार के दो नाम’ मालिकेतून घराघरात ओळखीचा झालेला इंद्रनील सेनगुप्तानेही या मालिकेनंतर बॉलीवूडमध्ये शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण तिथे सपशेल आपटल्यावर आता तो ‘महारक्षक देवी’ मालिकेतून खलनायकाच्या भूमिकेतून येणार आहे. आशीष चौधरी, सारा खान यांच्याही कथा कमीअधिक फरकाने अशाच आहेत. पण आता हे सगळे जुने चेहरे मालिकांमध्ये परतू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगमनाच्या चर्चा टेलीवूडमध्ये पसरल्या आहेत. त्यातील राम कपूरच्या परतण्याकडे सर्वाचेच डोळे लागले आहेत. पण इतकी वर्षे टीव्हीपासून दूर राहिल्यामुळे बाकीच्यांना मात्र त्यांच्या टीव्हीच्या कारकिर्दीची पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार आहे.
हे सर्व होत असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ‘ससुराल सिमर का’ मालिकेमध्ये एक सर्पकन्या घरात शिरली आहे. तिने म्हणे घरातल्या सर्वावर संमोहिनीही घातली होती. पण मालिकेच्या नायिकेने rv18साग्रसंगीत पद्धतीने सर्वाची त्यातून सुटका केली. आता या नागिणीला कसं ठेचायचं, यावर मालिकेत चर्चासत्र रंगताहेत. तंत्रविद्या, नागिणी, विषकन्या हे प्रकार आजही टीव्हीवर टीआरपी गोळा करू शकतात, यावरील निर्मात्यांच्या विश्वासाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. तर दुसरीकडे ‘असे हे कन्यादान’मध्ये ‘सध्या काय चालू आहे?’ असा प्रश्न कोणालाही विचाराल तर ‘अरेच्चा ती मालिका आहे का चालू अजून?’ असा उपप्रश्न विचारला जातो. ‘का रे दुरावा’मध्ये केतकर काकांपुढे सुहासचा खोटेपणा उघड झाल्यावर त्यांचं चिडणं आणि त्यांची खरेपणाची भूमिका या भागाचे प्रेक्षकांकडून बरेच कौतुक झाले.
सोशल मीडियावर अनेकांनी आपल्याला हा भाग आवडल्याचे सांगितले आहे. पण काकांच्या या भूमिकेमुळे जय-आदितीची पंचाईत झाली आहे. कारण अजूनही त्यांच्या नात्याबद्दल ऑफिसमध्ये सांगितलेलं खोटं काकांच्या समोर यायचंय. ते समोर आल्यावर काय होईल, या भीतीत सध्या ते आहेत. ‘माझे मन तुझे झाले’मध्ये अजूनही तोतया शेखरचे कारनामे चालू आहेत. तर दुसरीकडे ‘जुळून येती रेशीमगाठी’मध्ये चित्राला आदित्य आवडू लागला आहे. आता ती त्याला मिळवण्याच्या मागे असल्यामुळे परत मालिकेत नवा प्रेमत्रिकोण पाहायला मिळेल.