कलर्स मराठी वाहिनीवरील 2 MAD हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने परीक्षक म्हणजेच अमृता खानविलकर, उमेश जाधव, संजय जाधव आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे यात वाद नाही. या कार्यक्रमाचा सेट देखील खूपच आकर्षक आहे. हा सेट बनविण्यासाठी तब्बल ८ दिवस लागले आणि जवळपास ८० ते १०० माणसांनी मिळून हा सेट बनवला आहे.

‘2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर’चा हा सेट तीन भांगामध्ये विभागला आहे. जुरी टेबल, मेन स्टेज जिथे आपले स्पर्धक डान्स करतात आणि कॉन्टेस्टन्ट एरिआ (मॅड झोन आणि सॅड झोन) अशा तीन विभागांमध्ये हा सेट विभागला गेला आहे. जुरी टेबलच्या इथे पिसाऱ्यासारखे दिसणारे आकर्षक डिझाइन तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे लाईट्स वापरले गेले आहेत. अश्या प्रकारची स्टेजची रचना प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे. एरवी अश्या जागी प्लाझ्मा टीव्ही किंवा हा भाग सजविण्यासाठी वेगळ्या प्रकारची साधने वापरण्यात येतात.

2mad-set

कार्यक्रमातील मार्किंग सिस्टम देखील प्रेक्षकांना आवडू लागली आहे. १ ते १० मार्कांऐवजी वा स्माईलीज देण्याऐवजी सिग्नलद्वारे मार्किंग दिले जाते. स्पर्धकांना लाल आणि हिरव्या रंगाचे सिग्नल दिले जातात. परीक्षकांच्या सिटच्या मागे असलेल्या पिसाऱ्यामध्ये लाल अथवा हिरव्या रंगाच्या सिग्नलद्वारे त्यांना मॅड किंवा सॅड झोनमध्ये पाठवले जाते.