म्हणोनि मानिती लोक मज।।

सत्र ४

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे चौथे सत्र. पहिले पुष्प गुंफायचा मान श्रीमती धनाश्री घैसास यांना मिळाला. भीमपलाशी रागात विलंबित त्रितालातील ख्याल त्यांनी मांडला. आवाजाचा रेशीम पोत, दाणेदार, टपोरे स्वर, आत्मविश्वासपूर्ण, आकारयुक्त आलापी स्वर विचार सुस्पष्ट, कुठेही गडबड, गोंधळ मांडणीत जाणवला नाही. एक एक सूर घेऊन त्याच्या आधीच्या स्वरांना घेऊन पुन्हा पुन्हा त्या स्वरावर येऊन रागसौंदर्य वाढविण्याची पद्धत सुंदर होती. बढत कशी करावी, याचा हे गायन म्हणजे वस्तुपाठ होता.

[jwplayer ulkyd7Na]

बंदिशीचे काव्य हे स्वरांइतकेच महत्त्वाचे असते. त्यानेच गायन हे समृद्ध होत असते हे या गुणी गायिकेने रसिकांना दाखवून दिले. बहुतेक यथोचित घसीट, गमक बोलतानाचे प्रकार दाखवून नंतर द्रुत गंधर्व ठेका, त्रितालात- ‘जा जारे अपने मंदिरवा’ ही चीज खूप लडिवाळ स्वरोच्चाराने सादर केली. तसेच द्रुत एकतालात याच रागात तराणा खटक्याच्या तानांनी विशेष रंगला.

शेवटी ‘नजरिया लागे नही कही ओर’ हा  दादरा सादर करून आपले देखणे गायन थांबविले. आश्वासक तबलासाथ पुष्कराज जोशी तर स्वरसंवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांची. श्रुतींवर- अनुजा भावे, वैशाली कुबेर यांची होती.

यानंतर या स्वरमहोत्सवाचे सर्वेसर्वा पं. श्रीनिवास जोशी यांचे गायन त्यांचे सुपुत्र विराज जोशी यांच्या साथीत झाले. सुरुवातीस ‘यमन’ हा राग सादरीकरणासाठी निवडला होता. ‘लालन के संग’ ही विलंबित एकतालात बांधलेली बंदिश दमदारपणे सादर केली. ‘य: मन:’ जसे मनातील भाव तसा तो व्यक्त होतो. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या तालमीत २४ तास वाढलेले, त्यांचा सहवास लाभलेले श्रीनिवासजी खरंच भाग्यवान आहेत. पं. भीमसेनजींकडून खानदानी, घरंदाज गायकीचे सर्व पैलू ऐकावयास, शिकावयास व आत्मसात करावयास मिळाले. आजचे गाणे हे पं. भीमसेनजींचेच आहे. पुत्र व पौत्रामार्फत प्रवाहित झालेले. कलाकार हा अमर असतो  त्याची प्रचिती हे गायन ऐकून आली. विराज हे केवळ १३ वर्षांचे शैशव, पण समज खूप मोठी. विलंबित चीज स्वतंत्रपणे अनेक आवर्तने गाऊन रसिकांची दाद घेतली. गानप्रकार बहुतेक लयकारी, बोल, आलाप, खटक्याच्या तानांनी, यमन खूप रंगला. यानंतर मध्य लय त्रिताल पंडितजींनी ‘मोरी गगर ना भरन दे’ ही चीज ताकदीने गायली. खडा भरदार आवाज, सारंगीची सुरेख साथ भावली. याच रागातील तराणा हा त्रितालात, खटक्या मुरक्या तंत अंगाने गायला. गाण्यातले पौरुष, घरंदाजपणा काय असतो हे या पिता-पुत्रांनी दाखवून दिले. शेवटी संत नामदेवांचा ‘माझा भाव तुझे चरणी’  हा ‘बागेश्री’ रागावर आधारित अभंग गाऊन सर्वत्र भक्तीपूर्ण वातावरण निर्माण केले. शेवटी ‘माझे माहेर  पंढरी’ या ‘मिश्र मांड’ रागावर आधारित संत एकनाथांच्या अभंगाने मोठय़ा प्रमाणावर दाद घेतली.

‘आता तुझे नाम गात असे गीती, म्हणोनि मानिती लोक मज’ हा संत तुकाराममहाराजांचा अभंग म्हणजे उपदेश आहे असे समजून त्याचे तंतोतंत पालन पं. भीमसेनजींनी आयुष्यभर केले. अभंगवाणी हा त्यांचा जीव की प्राण होता. भारतरत्नसारखा सर्वश्रेष्ठ बहुमान त्यांना मिळाला आणि मुख्य म्हणजे व. पु. काळे यांच्या शब्दांत सांगायचेच तर पं. भीमसेन जोशी हे प्रत्येक वारकऱ्याच्या घरातील रेशनकार्डावर नाव नसलेले कुटुंबातील सदस्य आहेत व राहतील. तोच वारसा श्रीनिवासजी चालवत आहेत, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.

दर्जेदार कलाकारांच्या आजच्या या स्वरमालेचे पुढील कलाकार होते लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता. सतार आणि सरोदवादन. दोघेही मैहर या खास वाद्याचे घराणे यांचे वारसदार. उस्ताद बाबा अल्लाउद्दीन खाँ यांचे सर्वात दर्जेदार सर्वश्रेष्ठ शिष्य भारतभर होते. उस्ताद अली अकबर खाँ, पं. रविशंकर, पं. पन्नालाल घोष, शरण राणी. त्यापैकी विदुषी शरण राणीचे हे दोन शिष्य आपले वादन सादर करण्यासाठी येथे आले होते. उस्ताद अल्लाउद्दिन बाबांकडे शरण राणी प्रथम सरोद शिकायला गेल्या त्यावेळी त्यांच्या नोकराने रितीप्रमाणे सरोद बाबांपुढे आणून ठेवले. मग शरण राणी येऊन बसल्या. पहिला प्रश्न- ‘सरोद कुणाला शिकायचे आहे?’ उत्तर आले- ‘मला.’ ‘मग आता हा सरोद ठेवून कोण गेला?’ उत्तर- ‘तो माझा नोकर आहे.’ त्या क्षणी ‘सरोद शिकवणारच नाही असे सांगतिले गेले.’ सहा महिने शरण राणी बाबांकडे येऊन सरोद शिकवा म्हणून विनवत होत्या.

आपले वाद्य आपण स्वत: आणायचे, असे फर्मान सुटले आणि मग याच बोलीवर पुढे विधिवत सरोदचे शिक्षण सुरू झाले. असे कडक शिस्तीचे गुरू होते. पुढे त्या जगदविख्यात सरोदवादिका झाल्या.

लक्ष्य मोहन व आयुष मोहन यांनी सुरुवातीस जोग रागात आलाप, जोड, झाला पद्धतीने गत सादर केली. सरोदचे विलंबित थेट काळजाला भिडले. दोघांचे अप्रतिम असे रसायन जमून गेले आहे. मत्त तालातील गत अनेकवेळा उत्स्फूर्त दाद घेऊन गेली. शेवटी पं. रविशंकरांची प्रसिद्ध ‘माँज खमाज’ गत त्रितालात सवाल जबाबासह रसिकांची वाहवा घेऊन गेली. लोकाग्रहास्तव ‘मांड’ रागातील धून सादर करून हे वादन थांबले.

यानंतर पं. उदय भवाळकर या सुरेल कलाकारांचे धृपदगायन झाले. ख्याल गायकी व्हायच्या आधी तानसेनच्या काळात धृपद हा गानप्रकार विशेष प्रसिद्ध पावला. डागर बानी, खंडहर बानी, गौडी बानी अशी घराणी धृपद गायकीत होती. जसेच्या तसेच हे धृपद पिढय़ान् पिढय़ा पारंपरिक पद्धतीने प्रवाहित होत आहे. पं. उदयराजांचे गायन ऐकून एवढे एकच क्षेत्र आहे जिथे भेसळ नाही असे वाटत होते. स्वरांचा श्रुती आविष्कार अगदी सूक्ष्मतम पातळीवर सादर केला. आलापीमध्येही किती विविधता होती. कुठलाही ठेका नसताना अत्यंत लयबद्ध अशी ही स्वरांची पूजा चालू होती. श्रेष्ठ गायनाचे हे एक लक्षण असते.

विविध मेरखंड दाखविल्यानंतर चौतालात ‘आये रघुवीर’ हे धृपद सादर केले. अशा अनेक रचना गात आपले हे घरंदाज गायन आपल्या भरतखंडाचा समृद्ध वारसा ऐकवून आपले देखणे गायन थांबविले. प्रताप आव्हाड हा अनेक मोठय़ा महनीय पखवाजवादकांकडे वादन शिकून ही विद्या आत्मसात केलेला तरुण कलाकार. त्याने समर्पक अशी पखवाज साथ केली.

शशिकांत चिंचोरे

[jwplayer z1simstl]