चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांनी एकत्र येऊन ऊर्जितावस्था दिलेल्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला गेल्या गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. कसदार अभिनय, वेगळी धाटणी, मनाला भिडणारी संहिता अशा एकाहून एक वैशिष्टय़ांमुळे नावाजले गेलेले ५४ देशांतील १८० चित्रपट या महोत्सवातून दाखवले जाणार आहेत. दरम्यान, बॉलीवूडचा मि. परफेक्टशनिस्ट म्हणजेच आमिर खान याने दोनवेळा मामि चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली.

‘मामि’ चित्रपट महोत्सवाच्या शुभारंभाला आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटात त्याच्या मुलीच्या भूमिका साकारणा-या फातिमा सना खान आणि सान्या मल्होत्रा यांच्यासह हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच ‘दंगल’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर ‘मामि’ महोत्सवात “जो जीता वही सिकंदर” चित्रपटाच्या सेशनलाही आमिरने हजेरी लावलेली. यावेळी त्याच्या रील लाइफ मुलींसह त्याच्या रिअल लाइफ मुलीनेही उपस्थिती लावली. इरा खान ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी गीता यांची मुलगी आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘दंगल’मध्ये आमिर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सना आणि सान्या या महावीर यांच्या मुली गीता आणि बबिता यांच्या भूमिकेत दिसतील. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेला ‘दंगल’ हा चित्रपट २३ डिसेंबर २०१६ ला प्रदर्शित होईल.

मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या वैभवी ‘रॉयल ऑपेरा हाऊस’चे दरवाजे १८व्या जियो ‘मामि’ चित्रपट महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटप्रेमींसाठी खुले झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, जगभरातून आलेले चित्रपटकर्मी यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबपर्यंत रंगणाऱ्या या शानदार महोत्सवात खासकरून भारतीय चित्रपटकर्मीचे अनेकविध अप्रदर्शित, प्रदर्शित चित्रपट पाहायला मिळत आहेत. महोत्सवाचा शुभारंभच मुळी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट ‘अ डेथ इन द गुंज’ने झाला. याशिवाय, विक्रमादित्य मोटवने दिग्दर्शित ‘ट्रॅप्ड’ चित्रपटाचा प्रीमिअर महोत्सवात होणार आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’ही महोत्सवात प्रदर्शित होणार आहे.

aamir-with-daughters