‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’मध्ये पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांची उत्तरं या दोघांनी दिली. मराठी चित्रपटांत दिवसागणिक बदललेली विषयांची मांडणी आणि आशयघन चित्रपटांचं वाढतं प्रमाण याविषयी सांगताना वैभव म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगमध्ये बराच फरक पडल्याचं पाहायला मिळालं आहे’. परदेशात अद्यापही मराठी चित्रपट त्या पातळीवर प्रदर्शित होत नाहीत. पण, ते प्रदर्शित व्हावेतच असं मत वैभव तत्ववादीने मांडलं. इतर क्षेत्रांतील निर्मात्यांचा मराठी चित्रपटसृष्टीकडे कल वाढला आहे याकडे वैभवने सर्वांचं लक्ष वेधलं.

मराठी प्रेक्षक सुज्ञ प्रेक्षक आहे. चित्रपटाचं मार्केटिंग कसंही असो पण, प्रेक्षक कथानक पाहूनच चित्रपटाला दाद देण्यासाठी प्रेक्षक पुढे सरसावतात. पूजा सावंत हे नाव आता चांगलच लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे तिच्या नावाभोवती असणारं वलय पाहता हिंदी चित्रपटसृष्टीत काम केव्हा करणार अशा आशयाचा प्रश्न विचारला असता, ‘सध्यातरी माझं लक्ष मराठी चित्रपटसृष्टीवर असून, या क्षणाला मी मराठी चित्रपटसृष्टीत राहूनच मराठीचं नाव उंचावेन, असं पूजा सावंत म्हणाली.

यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेसोबतच रिअॅलिटी शोविषयीही या दोन्ही कलाकारांनी त्यांची मतं मांडली. कमी वयातच लहान मुलं कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा त्यांच्यातील निरागसता कुठेतरी हरवते असं वैभव म्हणाला. तर रिअॅलिटी शोचं सध्याचं वाढतं प्रमाण पाहता त्यातील रिअॅलिटीच कुठेतरी हरवली आहे असं ठाम मत पूजाने मांडलं.