बच्चन कुटुंबियांकडे प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला जातो. बच्चनच्या घरातील दिवाळी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. सिनेसृष्टीतील प्रत्येकजण या पार्टीला जायला उत्सुक असताता. आतापर्यंत सलमान खान, शाहरूख खान, एकता कपूर अशा सगळ्यांकडे दिवाळी पार्टी झाली. पण बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीसाठी आपल्याला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा बच्चन कुटुंबाकडे कोणतेही सेलिब्रेशन होणार नाही. पार्टी न होण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.

ऐश्वर्याचे वडिल कृष्णराज यांचे याचवर्षी मार्च महिन्यात निधन झाले. राय कुटुंब वर्षभर कोणतेही सण साजरे करणार नाहीत. पण त्यांच्या या दुःखात बच्चन कुटुंबियेही सहभागी झाली आहेत. संपूर्ण बच्चन कुटुंबिय कोणताही सण वर्षभर साजरा करणार नाही. दमदार दिवाळी पार्टीऐवजी बच्चन कुटुंब एकमेकांसोबत वेळ घालवणार आहेत. दिवाळी पार्टीच काय तर अमिताभ यांनी आपला वाढदिवसही जल्लोषात साजरा केला नाही. बिग बींच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंब मालदीवला गेले होते.

ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय कर्करोगाने पीडित होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण कर्करोग पलटल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.