पौराणिक किंवा ऐतिहासिक कथांमध्ये जिथे सत्तासंघर्ष येतो, तिथे गोष्टी, घटना नेहमीच वेगळ्या पद्धतीने घडतात असे नाही. लोकांचे मन जिंकणारा राजा आणि त्याच्या पराक्रमाची कथा ज्या पद्धतीने समोरच्याला सांगितली जाते, त्याचा तसा प्रभाव ऐकणाऱ्यावर पडतो. आपली कथा आणि व्यक्तिरेखा यांच्याशी प्रामाणिक राहून त्याची भव्यदिव्य मांडणी करत प्रेक्षकांच्या मनात उतरण्याचा जो चंग दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी बांधला होता, तो त्यांनी तितक्याच ठामपणे ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या सिक्वलच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’, हा प्रश्न केवळ उत्सुकता वाढवण्यासाठी होता. त्याचे उत्तर पौराणिक किंवा ऐतिहासिक कथांचा बाज जाणणाऱ्या कोणीही सुज्ञ प्रेक्षकाने अपेक्षिले असते त्याच पद्धतीने या चित्रपटातून येते. फक्त त्याची मांडणी करताना कथाकथनाची शैली, व्हीएफएक्स आणि आपल्या कलाकारांचा दमदार अभिनय या जोरावर प्रामाणिक आणि रंजकतेने करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मात्र तरीही हा चित्रपट पहिल्यापेक्षा सरस आहे, असे खचितच म्हणता येणार नाही.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट नावाप्रमाणे अमरेंद्र बाहुबली या राजाची गोष्ट सांगतो. ढोबळमानाने या सिक्वलमध्ये बाहुबली आणि त्याचा मुलगा महेंद्र बाहुबली अशा दोघांच्या कथा पाहायला मिळणार हे साहजिक होते. त्यातही महेंद्र बाहुबलीची कथा ही वडिलांच्या हत्येचा बदला एवढय़ापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे या दुसऱ्या कथेची मर्यादितता लक्षात घेऊन संपूर्ण चित्रपट अमरेंद्र बाहुबलीची व्यक्तिरेखा उभी करणे, माहिष्मती साम्राज्याचा भावी सम्राट म्हणून राणी शिवगामीने घोषणा केल्यानंतरचा त्याचा प्रवास, अनुरूप जोडीदार मिळण्यासाठीची खटपट, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या देवसेनेची (अनुष्का शेट्टी) व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी दिग्दर्शकाने जास्त वेळ घेतला आहे. त्यामुळे या सिक्वलपटाचा पूर्वार्ध अधिक लांबला आहे. पण पहिल्या चित्रपटापेक्षा यात बाहुबली, शिवगामी, कटप्पा, भल्लालदेव, त्याचे वडील बिज्जलादेव या आधीच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा अधिक ठळकपणे समोर येतात. या प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव, त्यांची तत्त्वे आणि सत्तासंघर्षांत या तत्त्वांपुढे हतबल ठरलेल्या मूळच्या प्रभावी व्यक्तिरेखा अशी नवी मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सिक्वलपट असला तरी तो पूर्णपणे वेगळा ठरतो. या मांडणीतूनच दिग्दर्शकाने कटप्पाने बाहुबलीला मारल्याचा प्रसंग सहजपणे रंगवला आहे. खरेतर, हा प्रसंग या चित्रपटातील नाटय़पूर्ण किंवा कथेला वळण देणारा प्रसंग असेल, अशी प्रेक्षकांची मनोधारणा झालेली असते. त्याला अगदी सहजी छेद देत कथेत वेगळ्या प्रसंगांमध्ये दिग्दर्शकाने धक्कातंत्राचा वापर केला आहे.

अमरेंद्र बाहुबलीचा धर्मावर असलेला विश्वास आणि शिवगामी प्रति असलेली श्रद्धा, जे जे न्याय्य ते योग्य मानून निर्भयपणे प्रसंगी शिवगामीलाही उत्तर देणारी देवसेना, एकीकडे बाहुबलीचा निष्ठावंत सेवक आणि दुसरीकडे त्याच्याशी असलेले भावनिक नाते या द्वंद्वातून घडणारा कटप्पा आणि ‘मेरा वचनही है शासन’ अशा कठोर भूमिकेतून वागणारी शिवगामीसारखी न्यायाच्या बाजूने असणारी स्त्रीही नकळतपणे अन्याय्य घटनेसाठी कारणीभूत ठरते, तेव्हा ‘बाहुबली’सारख्या पराक्रमी, धर्माने वागणाऱ्या राजाची अटळ शोकांतिका अशा अनेक पदरांमधून ‘बाहुबली’च्या कथेचा शेवट उलगडत जातो. दिग्दर्शकाने तुलनेने बाहुबलीच्या शोकांतिकेला जास्त महत्त्व दिले असून त्याच्या मुलाच्या सूडकथेला दुय्यम स्थान दिले आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ सूडनाटय़ उरत नाही. प्रभास हा खरोखरच या चित्रपटाचा ‘बाहुबली’ आहे. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली अशा दोन्ही भूमिका त्याने ज्या सहजतेने रंगवल्या आहेत त्याला तोड नाही. पराक्रमी आणि बुद्धिमान, विवेकी राजा, एका क्षणी देवसेनेच्या प्रेमात असलेला प्रियकर आणि संकट आल्यानंतर त्याच कणखरपणे आपल्या युद्धनीतीने येणारे संकट परतवून लावणारा राजा या सगळ्या गोष्टी प्रभासने आपल्या देहबोलीतून उत्तम वठवल्या आहेत. त्याला देवसेनेच्या भूमिकेत अनुष्का शेट्टीने तितकीच चांगली साथ दिली आहे. शिवगामीच्या भूमिके चे आणखी कंगोरे या चित्रपटात पाहायला मिळतात जे रामया कृष्णनने जिवंत केले आहेत. तीच गोष्ट कटप्पा म्हणजेच सत्यराज यांचीही आहे. मामा-दादा-ते शिवगामीला तू चुकीची वागलीस हे ठणकावून सांगणारा सेवक सत्यराज प्रत्येक प्रसंगात सरस ठरले आहेत. राणा डुग्गुबातीनेही शेवटपर्यंत बाहुबलीचा राग करणारा पराक्रमी भल्लालदेव अधिक धारदार केला आहे. कलाकारांचा अभिनय ही या चित्रपटाची ताकद आहे. तरीही तो पहिल्या भागाएवढा प्रभावी वाटत नाही, यामागची कारणे तंत्रात दडलेली आहेत.

सिक्वलपटात दोन कथा हाताळायच्या असल्याने मुळात चित्रपट पसरट झाला आहे. इथे फक्त कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे उत्तर न देता दिग्दर्शकाने अनेक छोटय़ा-मोठय़ा तपशिलांना महत्त्व देत बाहुबलीची व्यक्तिरेखा प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला वेळ तुलनेने जास्त आहे. एकच एक सरळसोट कथा न येता अनेक गोष्टी सांगायचा दिग्दर्शकाचा अट्टहासही चित्रपटाला मारक ठरतो. व्हीएफएक्सचे तंत्र ही या चित्रपटामागची खरी जादू आहे. त्यामुळे अनेक माहिष्मती, देवसेनेचे राज्य, युद्धाचे प्रसंग अधिक देखणे, प्रभावी झाले असले तरी काही ठिकाणी त्याचा वापर अंमळ जास्त झाला असल्याने तो ‘रजनीकांत’ स्टाईल दाक्षिणात्य चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. मात्र ही कथा फँटसीच आहे हे गृहीत धरले तर व्हीएफएक्सचा हा रंजकपणाही पाहणाऱ्याला निमूट मान्य करावा लागतो. पहिल्या चित्रपटाचे संगीत प्रभावी होते. त्यामानाने या चित्रपटातील एकही गाणे लक्षात राहत नाही. कित्येकदा पहिल्या चित्रपटातील गाण्यांचा वापर सिक्वलपटांमध्ये अधिक करत प्रेक्षकांना त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. इथे तोही प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही किंवा तसे जाणीवपूर्वक करण्याचे टाळले आहे. त्यामुळे गाणी आणि पाश्र्वसंगीत दोन्ही या चित्रपटासाठी तोकडे पडले आहे. ‘बाहुबली’ची दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली कथा दिग्दर्शक राजामौली यांनी कशा पद्धतीने सुफळ संपूर्ण केली आहे ते एकदा पाहायलाच हवे.

चित्रपट :  बाहुबली : द कन्क्लुजन

  • निर्माता – आर्क मीडिया वर्क्‍स
  • दिग्दर्शक – एस. एस. राजामौली
  • कलाकार – प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, रामया कृष्णन, सत्यराज, नासर, तमन्ना भाटिया, सुब्बाराजू.