‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जोडी ठरलेले अनुष्का शेट्टी आणि प्रभास त्यानंतर फारसे एकत्र दिसले नाहीत. पण, त्यांच्यातील खास नात्याची चर्चा सर्वदूर रंगली आहे. इतकेच नव्हे तर प्रभास आणि अनुष्का लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला. सध्याच्या घडीला मात्र अनुष्का आणि प्रभास प्रत्येक क्षण खास बनवण्यात व्यग्र असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभासच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही अनुष्काने काही खास बेत आखल्याचे वृत्त ‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केले आहे. आगामी चित्रपटांच्या वेळापत्रकातून वेळ काढून तिने प्रभाससाठी आखलेले हे बेत पाहता या दोघांचे नाते खूपच स्पेशल असल्याचे दिसत आहे.

‘बाहुबली’ प्रभासला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकजण शुभेच्छा देत असतानाच अनुष्काही त्यात मागे नाही. तिने वेळात वेळ काढून त्याला सुरेख भेटवस्तू दिली आहे. विविध ब्रॅण्ड्सच्या घड्याळांप्रती असणारी त्याची ओढ पाहता अनुष्काने त्याला एक खास डिझायनर घड्याळ दिले आहे. तिने दिलेली ही भेट प्रभासला नक्कीच आवडली असणार यात शंका नाही. पण, आता हे घड्याळ नेमके आहे तरी कसे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

दाक्षिणात्य अभिनेता म्हणून नावारुपास आलेला प्रभास सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील भूमिकेने त्याला एक वेगळीच ओळख देऊ केली. त्यामुळे आज अनेक चाहते आपल्या आवड्त्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर प्रभासनेही त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत चाहत्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ दिले. ज्यामुळे या खास दिवसाची रंगत आणखीनच वाढली. ‘साहो’च्या निमित्ताने प्रभासचा नवा लूक पाहून अनेकांची उत्सुकता वाढली आहे.