मराठी रंगभूमीवर सध्याच्या घडीला हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाटकं चांगली सुरु आहेत. बालनाटय़ांचीही काही वेगळी परिस्थिती नसते. बाल रंगभूमीचा विचार करता आपल्या मुलाने फक्त नाटकात काम करावे, एवढीच मनिषा बाळगून पालक तिथली वाट धरतात. मात्र नाटकांत काम करणाऱ्या या मुलांच्या पालकोंशिवाय बालरंगभूमीला प्रेक्षकच नाही असं विदारक दृश्य आहे. महाराष्ट्राचं हे चित्र मग अन्य राज्यांत काय चित्र असेल? याची कल्पनाच करायला नको, असं तुम्हाला वाटेल. पण तसं नक्कीच नाही. जवळपास पाच लाख मराठी भाषिकांचं इंदूर याला अपवाद ठरलं आहे. ‘मुक्त संवाद’ ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून इंदूरमध्ये मराठी भाषा, आपली संस्कृती आणि साहित्याचे संवर्धन करण्याचे काम करते आहे. पण फक्त चर्चासत्र घेण्यापर्यंत ही संस्था मर्यादित राहिलेली नाही. आपली पुढली पिढी इंग्रजी माध्यमात भले शिकत असेल पण त्यांना मराठी भाषेचीही गोडी हवी, हे मनाशी निश्चित करत या संस्थेने सात वर्षांपूर्वी बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बालनाटय़ महोत्सवात तब्बल ४१ बालनाटय़ सादर करण्यात आली, हे ऐकल्यावर बऱ्याचजणांना धक्का बसेल.

‘मुक्त संवाद’ संस्थेने सुरुवातीला व्याखानं, चर्चा, अशा कार्यक्रमांपासून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘घरपोच वाचनालय’ ही संकल्पना यशस्वीरीतीने राबवली. सध्याच्या घडीला त्यांचे पाचशेपेक्षा जास्त सदस्य असून प्रत्येक सदस्याला ते महिन्याला पाच पुस्तके घरपोच पोहचवतात. पण हे सारं झालं सुजाण नागरिकांसाठी. आपल्या पुढच्या पिढीची भाषा समृद्ध असावी, या उद्देशाने त्यांनी बालनाटय़ महोत्सव भरवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी बालनाटय़ महोत्सवात ९ नाटकं सादर झाली. दुसऱ्या वर्षांपासून हिंदी बालनाटय़ांचाही यामध्ये समावेश केला गेला. तिसऱ्या वर्षांपासून आतापर्यंत हा महोत्सव तीन दिवस चालत आहे. यावर्षी ४१ बालनाटय़ांमध्ये ५-१५ वयोगटांतील ५७० मुलांनी सहभाग घेतला होता.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार

आतापर्यंतची बहुतांशी सई परांजपे, सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी यांच्याच लेखणीतून उतरलेली बालनाटय़ सादर केली जात होती. बालरंगभूमीवर नवीन लेखक, दिग्दर्शक निर्माण व्हायला हवेत, यासाठीही या संस्थेने काही उपक्रम हाती घेतले आहेत. बाल साहित्य निर्माण व्हायला हवं, ही संस्थेची भूमिका आहे. त्यासाठी बालनाटय़ांसाठी एकांकिका स्पर्धेचेही आयोजन करायला त्यांनी सुरुवात केली. स्थानिकांनी बाल साहित्यामध्ये योगदान द्यावं, हा संस्थेचा मानस आहे. त्याचबरोबर जे दिग्दर्शक या एकांकिका बसवतात त्यांनाही मार्गदर्शन मिळण्याच्या हेतून शिबीराचेही आयोजन केले जाते. त्यामुळे ‘मुक्त संवाद’च्या बालनाटय़ महोत्सवामध्ये दरवर्षी विविध विषय पाहायला मिळतात. मुलांना राजा-राणी, चेटकीण-राक्षस या जुनाट विषयांपासून बाहेर काढत नवीन विषय आवर्जुन या महोत्सवात सादर केले जातात. या वर्षी स्त्री-भ्रूण हत्या, रोबोट, पर्यावरण, स्वच्छता, भ्रष्टाचार निर्मूलन असे विविध विषय महोत्सवात हाताळले गेले.

‘मराठी भाषा ही टिकायला हवी. पुढील पिढीला आपल्या मराठी भाषेबद्दल गोडवा निर्माण व्हायला हवा, हा आमचा मुख्य उद्देश आहे. बालनाटय़ सादर करताना मुलं भाषेमध्ये रमतात, त्यांना आपोआपच गोडी निर्माण होते आणि पुढे आपण काही तरी मराठी भाषेसाठी करायला हवे, ही भावनाही जोपासली जाते. सध्याच्या घडीला १५ वर्षांपुढील बरीच मुलं आमच्याकडे आहेत. त्यांनाही बालनाटय़ांमध्ये काम करावेसे वाटते. पण ५-१५ ही वयोमर्यादा असल्याने त्यांना काम करता येत नाही. पण त्यांना आम्ही नाटकाची विविध अंग जोपासण्यासाठी प्रेरित करतो’, असे संस्थेचे मोहन रेडगावकर सांगत होते. या बालनाटय़ महोत्सवाच्या निमित्ताने दोन पिढय़ा तरी आवडीने मराठी भाषेमध्ये काही तरी नवीन करू इच्छितात, हेच आमच्यासाठी पुरेसे आहे. या महोत्सवात आम्ही स्पर्धा ठेवलेली नाही, त्यामुळे कुणीही निराश होऊन या वर्तुळाच्या बाहेर पडत नाही. सध्याची युवा पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली पाहायला मिळते. या बालनाटय़ांमुळे त्यांना या मोबाईलच्या मायाजाळातून बाहेर काढण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला आहे. यापुढे २-३ बालनाटय़ांची निवड करून ग्वाल्हेर, जबलपूर, भोपाळ येथे प्रयोग करण्याचाही आमचा मानस आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात बरेच नाटकांचे, बालनाटय़ांचे महोत्सव भरवले जातात. पण त्यामध्ये जास्तीत जास्त १०-१५ नाटकं सादर केली जातात. त्यामुळेच ‘मुक्त संवाद’चा हा बालनाटय़ महोत्सव विशेष ठरतो. जर इंदूरमध्ये एवढय़ा मोठय़ा संख्येने प्रयोग केले जात असतील तर ते महाराष्ट्रात शक्य होऊ शकत नाहीत का?, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपला मुलगा रंगमंचावर दिसायला हवा, हा पालकांचा हव्यास आणि दुसरीकडे त्यांना लुटणारे भोंदू बालनाटय़ शिबीर भरवणारे महाभाग, यांच्यामध्ये महाराष्ट्रातील बालनाटय़ अडकलेले आहे. जर भाषा टिकवायची असेल तर आपल्याकडची बाल रंगभूमी टिकायला हवी, हा विचार पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात कधी रुजणार?, याचा विचार करायला हवा. सरकार त्यासाठी काही करेल न करेल, पण प्रत्येकाने आपल्या मनाशी काही गोष्टी ठरवल्या तर बाल रंगभूमी आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक रंगभूमीला पुन्हा दर्दी प्रेक्षकांसह सुगीचे दिवस येऊ शकतील.