‘उडता पंजाब’ चित्रपटात दिसणारी बारीकशा, नाव नसलेल्या, चेहऱ्यावर पसरलेला काळा रंग या अवतारातील अलिया भट्टला पाहिल्यानंतर कित्येकांना विश्वास बसत नव्हता. बॉलीवूडची उगवती ‘स्टार’ असा तिचा लौकिक आहे. त्यामुळे करण जोहरच्या तालमीतून तयार झालेली आणि त्याच्याच कॅम्पमधून पडद्यावर आलेली अलिया अशा पद्धतीने वास्तव भूमिका साकारेल आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणू शकेल, अशी कल्पना खुद्द तिच्या बॉलीवूडच्या सहकाऱ्यांनीही केली नव्हती. या चित्रपटात तिच्यासाठीचं म्हणून असलेलं ‘इक्क कुडी.. जिदा नाम मोहोब्बत’ हे गाणं जणू खरोखरच तिच्यावर बेतलं असावं इतक्या सहजतेने ती या भूमिकेशी, चित्रपटाशी एकरूप झाली होती. या चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या अलियाने अशी प्रत्येक भूमिका ही आपल्याला नवं काही देऊन जाते, ताजंतवानं करते, असं सांगितलं.
‘स्टुडंट ऑफ द इअर’ या पहिल्या चित्रपटापासून आत्तापर्यंत अलियाचे जेवढे चित्रपट आले तेवढे तिकीटबारीवरही यशस्वी ठरले आणि समीक्षकांनी तर तिच्या प्रत्येक भूमिके चे कवतिक केले. त्यामुळे अलिया खऱ्या अर्थाने बॉलीवूडची स्टार कलाकार आहे. मात्र बॉलीवूडमध्ये वरची, मधली आणि खालची असा जो काही खेळ चालतो त्यात आपल्याला अडकायचं नाही, असं तिने स्पष्ट केलं. माझ्या प्रत्येक चित्रपटातील भूमिका मी मनापासून करते आणि माझं काम जर चांगलं असेल तर ते साहजिकच मला पुढे पुढे घेऊन जाईल. त्यासाठी आघाडीची अभिनेत्री बनण्याचा अट्टहास करण्याची गरज आपल्याला पडत नाही, असं तिनं सांगितलं.
अलियाने इम्तियाज अली दिग्दर्शित ‘हायवे’ चित्रपटातही वेगळ्या वाटेवरची, हटके भूमिका केली होती. मात्र ‘उडता पंजाब’ची भूमिका आपल्यासाठी सर्वात जास्त अवघड आणि थकवणारी होती, असं तिने स्पष्ट केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे २१ दिवस मानसिकदृष्टय़ा खूप थकवणारे होते, असं तिने सांगितलं. त्याचं कारण म्हणजे आपण ‘मेथड’ अ‍ॅक्टर नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास करून ती साकारणे यावर आपला भर नसतो. माझ्याजागी कोणतीही अभिनेत्री असती तरी एक मुलगी म्हणून या चित्रपटात ती बिहारी तरुणी दुर्दैवी परिस्थितीत सापडल्यावर तिच्यावर काय मानसिक-शारीरिक परिणाम झाला असेल, याची कल्पना तिला आली असती. माझ्यासाठी भावनिकदृष्टय़ा हा चित्रपट खूप अवघड गेला. कित्येकदा रात्री उशिरा मी वाईट स्वप्न पडल्यामुळे झोपेतून दकचून जागी होत होते. त्यामुळे माझ्या तब्येतीवरही खूप वाईट परिणाम झाले. या सगळ्यातून बाहेर पडायला मला फार वेळ लागला, असं सांगणारी अलिया इतक्या मेहनतीनंतर आज जेव्हा तिला प्रेक्षकांकडून कौतुकाची पावती मिळते तेव्हा खूश होते. या चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा अलियाला बिहारी हेल पकडता आलेला नाही अशा स्वरूपाची टीका तिच्यावर झाली होती. मात्र लोक कित्येकदा चित्रपट न पाहता केवळ ट्रेलरवरून एखाद्या कलाकाराच्या कामाबद्दल चर्चा करतात याचा तिला राग येतो. चित्रपट पाहिल्यानंतर जर माझ्यावर टीका झाली तर त्यात मला वावगं वाटत नाही. चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करते. पण चित्रपट न पाहताच लोकांनी कलाकाराविषयी बोलू नये, असं मत ती व्यक्त करते.
‘स्टुडंट ऑफ द इअर’ या पहिल्या चित्रपटानंतर अवघ्या चार वर्षांत अलियाने आठ चित्रपट केले आहेत. त्यापैकी ‘शानदार’ वगळता बाकी सर्वच चित्रपटांतील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. किंबहुना, तिच्यासाठी म्हणून भूमिका लिहिल्या गेल्या. इतक्या लहान वयात ती शाहरूख खान, रणबीर कपूरसारख्या आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करते आहे. एवढय़ा कमी कालावधीत तिला फार झपाटय़ाने यश मिळत गेले याबद्दल भीती वाटत नाही का?, असं विचारल्यावर आपल्याला यश खूप लवकर मिळालंय हे ती पहिले मान्य करते. मात्र आता त्याची भीती वाटत नसल्याचे तिने सांगितले. उलट, आता लगोलग इतक्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर, कलाकारांबरोबर काम करायला मिळत असल्याबद्दल खूप छान वाटत आहे. जितके चांगले चित्रपट मला करता येतील, जितक्या वेगवेगळ्या भूमिका मला साकारता येतील तितक्या त्या साकारायच्या आहेत, असं ती म्हणते. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाला इतक्या वादविवादानंतरही मिळालेलं यश खूप मोलाचं असल्याचं तिने सांगितलं. चित्रपटाचा हेतू प्रामाणिक होता, विषय प्रामाणिक होता. त्यामुळे शेवटी आमचा विजय झाला आणि लोकांचाही पाठिंबा आम्हाला मिळाला, असं अलिया म्हणते. सध्या या आनंदाच्या वर्षांवातून बाहेर पडून तिने वरूण धवनबरोबरच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. तर शाहरूखबरोबर तिची मुख्य भूमिका असलेला गौरी शिंदे दिग्दर्शित चित्रपट सध्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे.