अभिजीत खांडकेकर

‘गोइंग बॅक टू द रूट्स’ असं आपण नेहमी म्हणतो. गेल्या काही दिवसांपासून मला याचा प्रत्यय येतोय. फक्त मलाच नाही तर इतर अनेकांनाही याचा प्रत्यय येत असावा. मधल्या काळात आपल्याकडच्या जुन्या गोष्टी बाजूला सारून आपण परदेशातल्या गोष्टींना आपलंसं करू लागलो. याची अनेक उदाहरणं देता येतील. मुलतानी माती किती चांगली आहे हे आपण सारे जाणतोच. पण याच मुलतानी मातीचं रूप बदलून तिला थोडं ग्लॅमरस करून तिचा एक मोठा ब्रॅण्ड तयार केला गेला. त्यामुळे आपल्याला आता मड पॅक म्हटलं की तो लावावासा वाटतो. पण मुलतानी माती नको वाटते. रोझ वॉटर म्हटलं की ते फार फॅन्सी वाटतं, पण गुलाबपाणी म्हटलं की ते गावठी वाटतं. हे शब्दांचे खेळ आहेत फक्त. याचं मूळ मात्र एकच आहे. तिकडच्या लोकांनी या वस्तूंचं खरं सत्त्व जाणलं आणि वेगळ्या स्वरूपात त्याचा एक ब्रॅण्ड तयार केला. त्या वस्तू आता आपण बरेच पैसे देऊन विकतही घेतो आणि त्या वापरून सुखीही असतो. मग त्याने फरक पडो किंवा न पडो!

एका मोठय़ा कॉफी शॉपने टरमरिक लाते हा कॉफीचा एक नवा प्रकार सुरू केला. या कॉफीमध्ये दुधाचं प्रमाण जास्त असतं. मिल्की कॉफी असते असं म्हणूया हवं तर. आपल्या देशातही हा कॉफीचा नवीन प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला. पण यातून एक लक्षात येतं की वर्षांनुर्वष आपल्या आजी, आई आपल्याला जे दूध-हळद देत आल्या आहेत तोच हा टरमरिक लाते प्रकार आहे. आपण आपल्याच संस्कृतीतल्या, आजीच्या बटव्यातल्या गोष्टी आपल्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी वापरत होतो. पण त्या नॉन ग्लॅमरस होत्या. त्यांना काही लोकांनी ग्लॅमरस रूप दिलं आणि आपण त्यावर उडय़ा मारायला लागलो. कधी उन्हाचा त्रास त्वचेवर झाला की, आई, आजी कोरफडीचं पान आणून त्याचा गर काढून तो लावायला सांगायची. पण तो तेव्हा फार गिळगिळीत वाटायचा. असं आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या स्वरूपांत कधी ना कधी वागलेलो आहोत. कोरफडीचा गर गिळगिळीत वाटायचा, पण अ‍ॅलोवेरा जेल तसं अजिबात वाटत नाही. उलट ते लावण्यासाठी त्याचे बरेच पैसे मोजले जातात.

हर्बल टी आणि कॉफीचे अनेकजण चाहते आहेत. पुष्कळदा हर्बल टी किंवा कॉफी ‘स्टाइल स्टेटमेंट’ असतं. ‘आय ओनली टेक हर्बल टी’ असं काही जण स्टाइलमध्ये समोरच्याला सांगतातही. पण वर्षांनुर्वष सर्दी, पडसं किंवा इतर कारणांमुळे तब्येत बरी नसली की कोरा चहा, कोरी कॉफी किंवा काढा पिण्याचे सल्ले घरातली वडीलधारी माणसं द्यायचे. त्याचे परिणाम चांगलेच होत होते हे वेगळं सांगायला नको. आता या काढा आणि कोऱ्या चहा-कॉफीची ‘हर्बल टी-कॉफी’ अशी ग्लॅमराइज्ड नावं आहेत. नावं, रूप बदललं तरी मूळ तेच असल्यामुळे आपण आता यू टर्न घेतोय, असं वाटू लागलंय.

हेच कपडय़ांच्या बाबतीतही झालंय. महात्मा गांधींनी खादीच्या कपडय़ांचा पुरस्कार केला. आता अगदी चरख्यावर नाही, पण ऑरगॅनिक कॉटन स्वरूपात तेच कपडे आता तुमच्यासमोर येतात. तेव्हा ते खूप कूल वाटतं. भारतातील उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेच कपडे कसे सोयीचे आहेत हे बडय़ा कंपन्यांनी पटवून दिल्यावर उमगतं आणि ते मान्यही केलं जातं. मग त्यासाठी जास्त पैसे मोजायला लागले तरीही तयारी असते. या ‘गोइंग बॅक टू द रुट्स’ वस्तूंमध्ये आणखी एक उदाहरण देता येईल ते म्हणजे कोल्हापुरी चपलांचं. कोल्हापुरी चपलांना आधुनिक साज चढवत त्यांचं रूप एकदमच बदलून टाकलं. त्यात वैविध्यही आलं. इंडो वेस्टर्न म्हणून नव्याने आलेल्या एका पेहरावात कुर्ता किंवा नेहरू जॅकेट या प्रकारांना थोडंसं बदललं आणि त्याला आताच्या काळानुसार सजवलं. ते दिसतंही एकदम छान! जे चांगलं आहे ते कधीच लपून राहू शकत नाही. त्याचं रूप जरा घासूनपुसून लखलखीत केलं की ते चांगलं दिसणारच! तसंच यामध्ये तांब्या पितळ्यांची भांडीही येतात. तांब्याच्या भांडय़ातून पाणी पिणं याचं किती अप्रूप असायचं. पूर्वी घरोघरी ही भांडी दिसायची. आता विशिष्ट थीम असलेल्या एखाद्या हॉटेलमध्ये अशी तांब्या पितळ्याची भांडी दिसतात. त्यात जेवण वाढलं जातं. पाणी दिलं जातं. तेव्हा आपल्याला ते स्टायलाइज्ड वाटतं. मग अशा वेळी वर्षांनुवर्ष आपल्या आधीच्या पिढीने अशीच भांडी वापरली आहेत. आपल्या पिढीतल्या काहींनी तीच भांडी जुनी म्हणून मोडीत काढली असतील, याचा विचार होणं मला गरजेचं वाटतं.

ज्या वस्तूंमध्ये सत्त्व आहे, ज्या खरंच चांगल्या आहेत; त्या कुठेच जात नाहीत. काळानुरूप त्याचं रूप बदलतं. ते बदलायला हवंच. जुनं ते सोनं यानुसार वागणारी आपली पिढी नाही. आणि तसं वागावं असं माझं म्हणणंही नाही. पण जुनं आणि नवं या दोन्हीचा उत्तम मिलाप करता येतो का हे बघायला हवं. जुन्याचं जुनेपण आणि नव्याचं नावीन्य या दोन्हीचा सुवर्णमध्य साधून त्याचा संयोग करता आला तर ते खऱ्या अर्थाने फ्युजन होईल आणि खऱ्या अर्थाने आपलं ‘गोइंग बॅक टू द रुट्स’ असं होईल!

शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा