बॉलीवूडमध्ये ठरावीक एका काळानंतर प्रस्थापित कलाकारांच्या मुलांची फळी येणं आणि त्यांचं चित्रपटसृष्टीत स्थिरावणं ही एक सातत्याने सुरू असलेली प्रक्रियाच झाली आहे जणू.. इतक्या वेगाने एक लाट येते, ती किनाऱ्यावर येऊन स्थिरावते तोच दुसरी लाट येते. वरुण धवन, अलिया भट्ट त्यानंतर टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर मग सूरज पांचोली, अथिया शेट्टी आणि या वर्षी अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सयामी खेर. ‘मिर्झिया’ या राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित चित्रपटातून हर्षवर्धन आणि सयामी ही दोन नवोदित कलाकारांची जोडी पडद्यावर येते आहे. त्यापैकी हर्षवर्धनचं नाव आपोआपच घराघरात माहिती असलं तरी सयामीही एका मोठय़ा कुटुंबाशी जोडली गेलेली आहे. मराठी अभिनेत्री उषाकिरण यांची ही नात. अभिनेत्री तन्वी आझमी ही सयामीची आत्या तर शबाना आझमी यांना ती मावशी म्हणते. असा काहीसा मोठा आणि वळणावळणाचा वारसा घेऊन आलेली सयामी थेट मराठीतच गप्पांना सुरुवात करते.
सयामीला आपल्या आजीची जितकी माहिती आहे तितकीच आत्याचीही.. या दोघींनीही वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवला. शिवाय, शबाना आझमी हे नाव तर समांतर आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमधलं दांडगं नाव आहे. शबाना मावशी आणि तन्वी आत्या या दोघींचाही आपल्यावर जबरदस्त पगडा असल्याचे सयामी म्हणते. कितीही मोठय़ा बॉलीवूड कलाकारांची मुलं असली तरी त्यांना इथे स्वत:ला सिद्ध करूनच काम मिळवावं लागतं. तसंच माझंही होतं. त्या दोघी खूप प्रसिद्ध आहेत, पण म्हणून हा चित्रपट त्यांच्या मदतीने मिळवलेला नाही. किंबहुना, माझी निवड झाली हेही त्यांना नंतर समजलं, असं ती स्पष्ट करते. सयामीने मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्याहीआधी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रंगभूमीवर ती सक्रिय झाली होती. या सगळ्याचा फायदा आता चित्रपट करताना होत असल्याचं तिने सांगितलं. पहिल्याच चित्रपटात राकेश ओमप्रकाश मेहरांसारखा दिग्दर्शक मिळणं हे सहजसोपं नव्हतं. सहा महिन्यांची ऑडिशन्स, दहा स्क्रीन टेस्ट्स, शरीर सुडौल बनवण्यासाठी घेतलेली मेहनत अशा एक ना अनेक गोष्टींची साधना केल्यानंतर या चित्रपटासाठी नायिका म्हणून आपल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं तिने सांगितलं. मात्र जेव्हा ही निवड झाली तेव्हा जबाबदारीची जाणीव जास्त होती, असं ती म्हणते. याचं कारण म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’नंतर राकेश मेहरांचा हा चित्रपट खूप महत्त्वाकांक्षी आहे. या चित्रपटासाठी चक्क गुलजारजी इतक्या वर्षांनी लिहिते झाले आहेत. त्यामुळे कथा-पटकथा, गीत-संगीत आणि दिग्दर्शन सगळ्याच बाबतीत हा चित्रपट वरच्या स्तरावरचा आहे. त्यात हर्षवर्धन आणि मी आम्ही दोघंही वयाने, अनुभवाने लहान असलेल्यांनी ही कथा कलाकार म्हणून पेलून धरणं ही स्वप्नवतच गोष्ट असल्याचं सयामी सांगते.
‘मिर्झिया’ ही मिर्झा साहिबा या प्रख्यात प्रेमी युगुलावर आधारित कथा आहे, असं म्हटलं तरी राकेश मेहरा यांच्या शैलीनुसार अत्यंत आधुनिक काळात ही कथा घडते. जुन्या आणि आधुनिक अशा दोन काळांत ही कथा घडते. मात्र त्यापेक्षा आणखी काही सांगण्यास सयामी तयार होत नाही. राकेश मेहरांशी तिचे आधीपासूनच कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते आमच्या घराजवळच राहत असल्याने माझ्या प्रत्येक अडीअडचणीत मी त्यांच्याकडे धाव घ्यायचे. माझ्या आजवरच्या जडणघडणीत राकेश सरांचा मोठा वाटा आहे, असं ती म्हणते. ‘मुळात त्यांच्यासारख्या दिग्दर्शकाची पद्धतच वेगळी आहे. सेटवर आमच्याकडून कितीही चुका झाल्या तरी ते कधीही आमच्या अंगावर ओरडले नाहीत किंवा अमुक एका पद्धतीनेच रट्टा मारून संवाद म्हण, सीन दे असा अट्टहासही त्यांनी केला नाही. तुम्ही समजून घ्या आणि करा.. हा त्यांचा सतत आग्रह असतो. ते खूप छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून शिकवत राहतात’, असं सांगताना ती तिचा लक्षात राहिलेला अनुभव सांगते. ‘मिर्झिया’च्या चित्रीकरणादरम्यान माझा एक क्लोजअप शॉट घ्यायचा होता. त्या शॉटसाठी खूप वेगळ्या प्रकारचा लुक, जड अलंकार-पोशाख असं सगळं परिधान करून मी शॉटसाठी आले. माझ्या आजूबाजूला पंधरा-वीस माणसं सहज वावरत होती. शॉट देण्यासाठी म्हणून मी खाली बसले. बराच वेळ चित्रीकरण सुरू असल्याने कित्येक तास त्याच एका स्थितीत बसून होते. त्यामुळे शॉट संपल्यानंतर स्वत:हून उठताही येत नव्हतं आणि आजूबाजूची लोकं तर लक्षही देत नव्हती. ही सगळी गंमत दुरून बघणाऱ्या राकेश सरांनी ही इंडस्ट्री कशी आहे याची तुला कल्पना आली असेल, असं म्हटलं आणि मी चमकले. इथे यशाबरोबर लोक आपल्याभोवती गोळा होतात आणि एका क्षणात दूरही निघून जातात. इथलं यशही असंच आहे येत-जात राहणारं.. त्यामुळे पैसा, ग्लॅमर या गोष्टी कधीच गंभीरतेने घ्यायच्या नाहीत. आपण स्वत:च इथे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांचे ते शब्द आणि तो प्रसंग सतत मनात घुमत राहतात’, हे सांगत असतानाच आपण त्यांच्याबद्दल बोलायला लागलो की थांबतच नाही असं ती हसत हसत सांगते.
‘मिर्झिया’च्या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच इंडस्ट्रीत एक ओळख मिळाल्याचंही तिने सांगितलं. हर्षवर्धनमुळे अनिल कपूर यांच्याशी ओळख झाली. ते सातत्याने सेटवर असल्याने त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली तेव्हा कोण आनंद झाला असं सांगणारी सयामी याचनिमित्ताने अलियासारखी मैत्रीण मिळाल्याबद्दलही आनंद व्यक्त करते. अलिया, करण जोहर आणि आत्ताचे सगळे तरुण कलाकार यांच्याकडून नव्या कलाकारांना मिळणारा पाठिंबाही खूप महत्त्वाचा असल्याचे तिने सांगितले. सयामीने याआधीच ‘रे’ या तेलगू चित्रपटात काम केले आहे. ‘मिर्झिया’नंतर मणीरत्नम यांच्या चित्रपटात ती काम करणार आहे मात्र अजून त्याची सुरुवात झाली नसल्याचे तिने स्पष्ट केले.

शबाना आणि तन्वी यांच्यामुळे आमच्या घरात अठरा राष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि त्याचं दडपण नसलं तरी कुठेतरी ती जाणीव सतत मनात असते. माझे आईवडील नाशिकला राहतात. मला इथे आत्याच जवळ आहे. त्यामुळे माझ्या कुठल्याही गोष्टीत बरं-वाईट सांगण्याचं काम ती प्रामुख्याने करते. ती माझी पहिली परीक्षक आहे. तर शबाना मावशी माझ्या हिंदीच्या उच्चारांबाबत सातत्याने छडी घेऊन बसलेली असते. या दोघींच्या गुणांमधले पाच टक्के जरी माझ्यात उतरले तरी मी खूप भाग्यवान आहे असं समजेन.
सयामी खेर