मराठी सिनेसृष्टी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळण्यासाठी ओळखली जाते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा ‘चि. व चि.सौ.का.’ या सिनेमावेळी येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून अनेकांच्या गळ्यातला ताईत बनलेला ललित प्रभाकर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्यासोबत मृण्मयी गोडबोलेही स्क्रिन शेअर करताना दिसेल. ललित आणि मृण्मयी पहिल्यांदा एकत्र सिनेमात काम करत असल्यामुळे एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात ललितची सौरयंत्र बनवण्याची कंपनी असते तर मृण्मयी प्राण्यांची डॉक्टर. अॅरेंज मॅरेजसाठी हे दोघं समोरासमोर येतात आणि मग काय धमाल उडते या विषयावर हा सिनेमा आधारित आहे. हे दोघं एकमेकांना पसंत करतात खरे पण त्यांच्या घरातल्यांच्या आपल्या भावी सुनेबद्दलच्या आणि जावयाबद्दलच्या अपेक्षाही भन्नाट असतात हे टीझर पाहून कळते. टीझरमध्ये भारत गणेशपुरे लग्न जुळवणाऱ्या ब्रह्मदेवाची भूमिका साकारताना दिसतो आहे. १ मिनिट १८ सेकंदाच्या हा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे मोशन पोस्टरही प्रदर्शित झाले होते.

लग्न, जोडपं, वऱ्हाडी यांचे आगळे वेगळे स्वरूप या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते. साडी आणि सदरा या पारंपरिक वेशभूषेत ललित आणि मृण्मयी दिसतात. मराठमोळ्या वेशामध्ये मृण्मयी आणि ललित यांच्यापासूनच या मोशन पोस्टरची सुरूवात होते. त्यामागोमाग इतर कलाकार मंडळींचीही लक्षवेधी रुपं पाहायला मिळतात.

सिनेमात सहभागी प्रत्येक कलाकाराची ओळख करुन देण्यासाठी दहा तोंडांच्या रावणाची संकल्पना ‘चि. व चि.सौ.का.’च्या मोशन पोस्टरमध्ये प्रभावीपणे वापरण्यात आली. या रावणरुपी मोशन पोस्टरमध्ये अभिनेता भारत गणेशपुरे, पुष्कर लोणकर, शर्मिष्ठा राऊत यांचीही झलक पाहायला मिळतेय.

नव्या धाटणीचे कथानक, सिनेमाचे हटके पोस्टर, टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत उत्सुकता वाढताना दिसते. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचेच आहे. त्यामुळे ही या सिनेमाची जमेची बाजू आहे असेच म्हणावे लागेल. हा लग्नबंबाळ, धमाल गोतावळा मे महिन्याच्या १२ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.