सलग आठवडाभर अमुक एका ठिकाणी चायनीज खाद्यपदार्थ खायला मिळणार असे म्हटले तर तिथे खवय्यांची गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही इतके लोक चायनीज खाण्याचे दर्दी आहेत. चायनीज खाद्यपदार्थ आणि वस्तू जशा आपल्याकडे हल्ली गल्लोगल्लीत मिळू लागल्यात तितक्या वेगाने चायनीज चित्रपट मात्र आपल्याकडे पोहोचत नाही. सध्या दूरदर्शन वाहिन्यांच्या माध्यमातून जे डब चायनीज चित्रपट पाहायला मिळतात ते वगळता हे चित्रपट पाहण्याचा एकमेव पर्याय हा चित्रपट महोत्सव हाच असतो. मुंबईकरांसाठी हा आठवडा चायनीज चित्रपटांची मेजवानी देणारा ठरणार आहे. २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत एनसीपीएच्या लिटिल थिएटरमध्ये संध्याकाळी ४ वाजल्यानंतर या चायनीज चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.

‘इंडिया चायना फिल्म सोसायटी’ आणि ‘चायना फिल्म असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच ‘चायना फिल्म वीक’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘भारत आणि चीन यांच्यात व्यावसायिकतेबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाणही व्हावी या हेतूने ‘चायना फिल्म वीक’चे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती नव्यानेच स्थापन झालेल्या ‘इंडिया चायना फिल्म सोसायटी’चे संस्थापक प्रकाश राहुले यांनी दिली. या चायनीज चित्रपट महोत्सवात ‘चायना फिल्म असोसिएशन’चे मुख्य झु बेलिन, दिग्दर्शक अ‍ॅन झांजुन यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आहे.

सप्ताहात दाखविले जाणारे चित्रपट

‘चायना फिल्म वीक’चा शुभारंभ ‘थ्रु स्टनिंग स्टॉम्र्स’ या चित्रपटाने शुक्रवारी करण्यात आला. २२ ऑक्टोबरपासून दररोज या चायनीज चित्रपटांच्या महोत्सवात ‘चायनीज झोडिअ‍ॅक’, ‘मंकी किंग हिरो इज ब्लॅक’, ‘मॉन्स्टर हंट’, ‘द अनएक्सपेक्टेड’, ‘मिस ग्रॅनी’, ‘इफ यू आर द वन टू’, ‘मनी ऑन द रोड’ हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.