सध्या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि वेगवेगळ्या फेस्टची धूम सुरु आहे. सगळ्याच कॉलेजमध्ये उत्साहाचे आणि जोशपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशा जल्लोषाच्या वातावरणात जर तुमचे लाडके कलाकार तुम्हाला भेटायला थेट तुमच्या कॉलेजमध्ये आले तर? कलर्स मराठीवरील ‘सख्या रे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ आणि ‘२ मॅड’ या कार्यक्रमातील कलाकार नुकतेच विद्यालंकार कॉलेजमध्ये विद्यार्थांची भेट घेण्यासाठी गेले होते. आपल्या लाडक्या कलाकारांना कॉलेजमध्ये बघून विद्यार्थ्यांना कमालीचा आनंद झाला. जवळजवळ ८००-१००० विद्यार्थी या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपल्या आवडत्या कलाकारांना बघायला आले होते. यावेळी कॉलेजमध्ये बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम राबाविण्यात आले होते. ज्याच्यासाठी ‘सख्या रे’ मधील सुयश टिळक आणि रुची सुवर्ण, ‘अस्सं सासर सुरेख बाई’मधील महाराष्ट्राची लाडकी मृणाल दुसानीस आणि श्वेता पेंडसे, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील विनोदवीर योगेश शिरसाट आणि नम्रता आवटे आणि ‘२ मॅड महाराष्ट्राचा अस्सल डान्सर’ या सध्या गाजत असलेल्या कार्यक्रमातील स्पर्धकांनी म्हणजेच निखील, आर्या डोंगरे, सोनल विचारे आणि मंगेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.

या फेस्टीवलमध्ये मृणालला बघून प्रेक्षकांनी त्यांना झालेला आनंद आपल्या टाळ्यांच्या आवाजाने व्यक्त केला. मृणालने प्रेक्षकांसाठी गाण देखील म्हंटलं जे प्रेक्षकांना खूपच आवडलं. सुयश आणि रुची यांनी “सख्या रे” मालिकेच्या शीर्षक गीतावर नृत्य केले. तसेच विद्यालंकार कॉलेजची Mr.& Ms VIT या स्पर्धेचे परीक्षण केले. “ मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले, विद्यालंकार कॉलेजमधील मुलं फार उत्साही आहेत, विद्यालंकार कॉलेजमध्ये येऊन मला खरंच खूप मजा आली”, या शब्दात सुयशने आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी कॉलेजमधील मुलांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रमदेखील सादर केले. याचे परिक्षण कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील कलाकारांनी केले. त्यातील देशभक्तीवर आधारित एक अॅक्ट बघून नम्रताच्या डोळ्यात पाणी आले. पण या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांसोबत कलर्स मराठीच्या कलाकारांनी अनेक मोलाचे सल्ले शेअर केले. तसेच २ मॅड- महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या सध्या गाजत असलेल्या कार्यक्रमातील स्पर्धकांनी म्हणजेच निखील, आर्या डोंगरे, सोनल विचारे आणि मंगेश यांनी आपल्या तुफान नृत्याने विद्यार्थ्यांची मने जिंकली.