बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारतीयांच्या फार जवळच्या आहेत. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यातली मैत्रीही फार घनिष्ट असते. काहींच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होईऊ पुढे ते विवाह बंधनात अडकतातही. याचे ताजे उदाहरण म्हणजे युवराज सिंग आणि हेजल केच. या दोघांनी ३० नोव्हेंबरला पंजाबी पद्धतीने लग्न केले. तर नंतर गोव्यात हिंदू पद्धतीनेही दुसऱ्यांदा लग्न केले. हे काही पहिल्यांदा झाले नाही की, कोणताही क्रिकेटर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. याआधी शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतौडी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या जोडप्यांची उदाहरणे आहेतच.

स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, परत एकदा बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटर अशी जोडी जुळताना दिसत आहे. झहीर खान आणि चक दे इंडियाची अभिनेत्री सागरिका घाटगे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहण्यात आले. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, दोघं या लग्न सोहळ्यात हातात हात घालूनच फिरत होते. त्यामुळे या सोहळ्यात त्यांच्यावरही अनेकांचे लक्ष होते.

सागरिका, क्रिकेटर- अभिनेता अंगद बेदी याची फार जवळची मैत्रिण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करुन दिली होती. दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. आता दोघंही आपल्या नातेसंबंधांबद्दल लवकरच अधिकृत घोषणा करणार आहेत. हे पहिल्यांदा नाहीए की झहीर कोणा अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. याआधी झहीर आणि अभिनेत्री ईशा शरवानी एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही.

भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि मॉडेल अभिनेत्री हेजल केच यांनी २ डिसेंबरला गोव्यामध्ये लग्न केले. या जोडप्याने आधी ख्रिश्चन पद्धतीने मग पंजाबी पद्धतीने आणि नंतर हिंदू पद्धतीने लग्न केले. गोव्यामध्ये दुपारी लग्न झाल्यानंतर संध्याकाळी खास रिसेप्शनही ठेवले होते. यावेळी बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातले त्याचे जवळचे मित्र मैत्रिणी आले होते. यावेळी झहीर खान आणि सागरिका घाटगे हेही आले होते.