बी टाउनची लीला, मस्तानी अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आता लवकरच सलमान खानसोबत त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. सलमान खानच्या बहुचर्चित ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट कबीरचा आतापर्यंतचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचे म्हटले जातेय. चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान पहिल्यांदाच लडाख येथे शूटींग करत आहे.
हॉलीवुडमध्ये पदार्पणाच्या तयारीत व्यस्त असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खानसह एकाच चित्रपटाच दिसणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. दीपिका इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे ते काम संपवून त्यानंतर ती चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपस्थित राहणार आहे, आशीही माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जर असे झाले तर सिनेरसिकांना एका नव्या आणि बहुप्रतिक्षित जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील सर्व कलाकार आणि टीम जवळपास महिनाभर लडाख येथे शूटींग करणार आहेत. बजरंगी भाईजानच्या वेळी सलमानने पहिल्यांदाच काश्मिरमध्ये शूटींग केले होते. त्यावेळी काश्मिरच्या सौंदर्याने तो भारावून गेला होता. ट्युबलाइट हा चित्रपट चीन आणि भारतात झालेल्या युद्धावर आधारित आहे. तर याची कथा एक सामान्य माणूस आणि लहान चीनी मुलगी यांच्याभोवती फिरेल. या चित्रपटात सलमानचा लहान भाऊ आणि अभिनेता सोहेल खानदेखील झळकणार आहे.