उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतापजनक प्रतिक्रीया उमटत आहेत. राजकीय पटलासोबतच कलाक्षेत्रातूनही उरी हल्ल्यावर अनेक कलाकारांनी त्यांची मते मांडली. पण नुकतेच पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या अल्टीमेटम विरोधात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्याच्या केलेल्या मागणीवर काही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी टिका केली आहे. या टिकाकारांमध्ये सध्या हंसल मेहता आणि विक्रम भट्ट यांची नावे चर्चेत आहेत. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. पाकिस्तानातील अनेक कलाकार विविध कार्यक्रमांसाठी सध्या मुंबईत आहेत. त्यांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशारा मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता. यासोबतच त्यांनी जे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक पाकिस्तानी कलाकारांना आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी देत आहेत अशा निर्माता-दिग्दर्शकांनाही धमकावले होते. मनसेच्या या विधानावर चित्रपट वर्तुळात नावाजलेल्या हंसल मेहता यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे मत मांडले.

‘मनसेने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. शेवटी कलाकारच अशा हल्ल्यांना खतपाणी देतात’ असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तर दुसरीकडे हंसल मेहता यांच्या म्हणण्याशी सहमत होत विक्रम भट्ट यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. कलाकारांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीने आपण या मुद्द्याला आणखीनच कमकुवत बनवत आहोत असे मतही विक्रम भट्ट यांनी मांडले. ‘या प्रकरणात अनेकांचे प्राण जात आहेत, आपण प्रत्येक गोष्ट फक्त सहन करत आहोत….आणि या परिस्थितीत फक्त कलाकारांवरच बंदी आणली जात आहे’ असे मत मांडत विक्रम भट्ट यांनी अनेकांचे लक्ष वेधले. त्यामुळे सध्या चित्रपटसृष्टी आणि मनसेचे अल्टीमेटम यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे.

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढत आहे. जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. राजकारणानंतर या घटनेचे पडसाद कलाक्षेत्रावरही पडताना दिसत आहेत.