सिनेमाला भाषा नसते, पडद्यावर जे दिसतं ते मनाला भिडायचं असेल तर तिथे शब्दच्छल करून चालत नाही. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीची अनकही कथा सांगताना दिग्दर्शक नीरज पांडेने नेमकी तीच फसवणूक केली आहे. बिहारच्या रांचीमध्ये सर्वसामान्य घरात जन्मलेल्या धोनीचा क्रिकेट संघापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता आणि तो आजवर फारसा लोकांसमोर आलेलाही नव्हता. त्यामुळे टेस्ट मॅचप्रमाणे लांबलेल्या तीन तासांपेक्षाही लांबीने मोठय़ा असलेल्या या चित्रपटात धोनीचा भारतीय क्रिकेट संघापर्यंतची अनकही संघर्षमय दास्ताँ आपल्यापर्यंत पोहोचते. मात्र भारतीय संघात आल्यानंतरचा त्याचा खेळ, कर्णधार म्हणून त्याच्यासमोरची आव्हाने, त्याने घेतलेल्या कठोर निर्णयांमागची त्याची विचारसरणी अशा कित्येक गोष्टींना दिग्दर्शकाने हातच लावलेला नाही. त्यामुळे माहीची ही कथा अर्धवट राहते, त्याच्या खेळाप्रमाणे त्याची गोष्ट मात्र काळजाचा ठाव घेत नाही.

‘एम. एस. धोनी : अनकही कहानी’ या नावाप्रमाणेच सरळ आणि लांबलचक असा चित्रपटाचा प्रवास पाहायला मिळतो. रांचीतून दिल्लीपर्यंतचा खेळाचा प्रवास त्याच्यासारख्या कुठल्याच मुलासाठी सोपी गोष्ट नव्हती. मात्र लहानपणी क्रिकेटपेक्षा फु टबॉलच्या खेळात रस घेणारा महेंद्रसिंग धोनी आपल्याला पहिल्यांदाच कळतो. क्रिकेटच्या मैदानावर पंप ऑपरेटर म्हणून काम करणारे, स्टेडिअमला पाणी देणारे त्याचे वडील आणि त्याच ग्राऊंडवर क्रिकेटर म्हणून मोठे होण्याचे स्वप्न पाहणारा धोनी यांच्यातला संघर्ष सर्वसामान्य घरांतून जाणवणारा आहे. वडिलांना दुखवायचे नाही म्हणून शिक्षण पूर्ण करणारा, त्यांच्यासाठी टीसीची नोकरीही घेणाऱ्या धोनीला खेळ रक्तात भिनलेला असूनही कित्येकदा हुलकावणी मिळते. पैसे नसतानाही मित्रांच्या मदतीने आपला खेळ सतत उंचावत ठेवणारी धोनीची चित्रपटाच्या पूर्वार्धातील कथा खूप चांगली रंगली आहे. तांत्रिकदृष्टय़ा सुशांतसिंग राजपूतला कुमार वयातील धोनीच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्नही दिग्दर्शकाने चांगला साधला आहे. मात्र तरीही धोनीची कथा कित्येकदा सरधोपटपणे सांगत चित्रपट पुढे सरकत राहतो. गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या चरित्रपटांमध्ये ‘एम. एस. धोनी : अनकही कहानी’ हा चित्रपटही मांडणीत तितकाच चांगला असेल, अशी एक अपेक्षा होती. मात्र भारतीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास जितक्या विस्ताराने येतो तितक्याच वेगाने त्यानंतरच्या घटनांना अगदी चुटपुटता स्पर्श करत चित्रपट धावत राहतो. विश्वचषक जिंकून देणारा, सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट सामने जिंकून देणाऱ्या, स्वत:च्या शैलीदार खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीचा खेळ हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. पूर्वार्धात तो वेगवेगळ्या सामन्यांमधून येतो. मात्र धोनीने ज्या परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून सूत्रे हातात घेतली ती परिस्थिती, मोठमोठय़ा क्रिकेट संघांसमोर खेळताना कर्णधार म्हणून त्याने घेतलेले निर्णय, त्याचे धोरण हे कुठेच दिसत नाही. ज्या तीन खेळाडूंना काढण्याच्या निर्णयावरून वाद झाला त्यामागची त्याची विचारसरणीही दाखवायचे कष्ट दिग्दर्शकाने घेतलेले नाहीत. त्याउलट, धोनीच्या पहिल्या प्रेयसीची कथा आणि त्यानंतरची त्याची लग्नापर्यंतची कथा यातच चित्रपट फसला आहे. खऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेहऱ्याऐवजी सुशांतचा चेहरा चिकटवण्याची कलाही बेमालूमपणे जमली आहे. मात्र त्यानिमित्ताने, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, युवराज सिंग असे कित्येक नामी खेळाडू आणि त्यांच्याबरोबरचे धोनीचे संबंध हाही या चित्रपटातला महत्त्वाचा धागा होता. त्याऐवजी सामन्यांच्या फु टेजमध्ये दिसणारे त्यांचे चेहरे, कधी पाठमोरे जाणवणारे त्यांचे अस्तित्व आणि मिक्सिंग कला यावरच प्रेक्षकांना भागवून घ्यावे लागले आहे. पूर्वार्धात आपल्याला युवराज सिंगची भूमिका साकारणारा कलाकार (हॅरी तांगरी) पाहायला मिळतो. नंतर मात्र युवराज आणि धोनीच्या उपलब्ध फुटेजवरच काम चालवून घेतले असल्याने कु ठल्याही खेळाडूशी जमलेली त्याची केमिस्ट्री कुठेच रंगत नाही. फक्त दिसतो तो धोनीच्या रूपातला त्याच स्टाईलने फटकेबाजी करणारा सुशांत..

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

एका यशस्वी कर्णधाराचा पडद्यावरचा खेळ अजिबातच रंगत नाही. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीची भूमिका ठसवण्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या खेळापासून प्रत्येक ठिकाणी जाणवते. धोनी आणि त्याच्या मित्रांची पूर्वार्धातली गोष्टही खूप छान आहे. अगदी रेल्वेची नोकरी करतानाचे त्याचे सहकारी, त्या वेळचे अनुभव हा सगळा भाग सुशांतसह अन्य कलाकारांनी खूप चांगला रंगवला आहे. पण मुळात दिग्दर्शकालाच धोनीचा स्वभाव नेमका कळलेला नाही की काय अशी शंका यावी इतक्या गोंधळलेल्या पद्धतीने पडद्यावरचा धोनी व्यक्त होताना दिसतो. प्रत्येक निर्णयामागे ठाम असतानाही त्याचे ठोस कारण, त्याचा स्वत:चा विचार जाणवतच नाही. तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याने माहीचा संघर्ष जाणवूनही तो प्रेरणादायी वाटत नाही. सांगायच्या राहून गेल्या अशा काही गोष्टी आपण दिग्दर्शकाक डून ऐकत असल्यासारखे वाटते. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूत भक्कम खेळी करणारा, पूर्वार्धात षटकार मारत खेळणाऱ्या दिग्दर्शक नीरज पांडेने त्यानंतर मात्र हा सामना अर्धवटच सोडला आहे.

एम. एस. धोनी :  अनकही कहानी

दिग्दर्शक : नीरज पांडे

कलाकार : सुशांत सिंग राजपूत, अनुपम खेर, कियारा अडवाणी, दिशा पतानी, हॅरी तांगरी, भूमिका चावला, राजेश शर्मा.