जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या असंख्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लोकसत्ता’ने नेहमीच नवमाध्यामांना आपलेसे केले आहे. ‘लोकसत्ता’ ऑनलाइनतर्फे राबविण्यात येणाऱ्या चॅटरुममध्ये यंदा हजेरी लावली ते म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर हिने. अमृता लाइव्ह चॅटमध्ये सहभागी होणार असल्यामुळे वाचक आमि तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. या लाइव्ह चॅटला मोठ्या उस्ताहात सुरुवात करत अमृताने म्हटले की ‘मी सध्या मॅड आहे’. अर्थात इथे मॅड या शब्दाचा उल्लेख करण्याचे कारण असे की, ही अभिनेत्री सध्या ‘२ मॅड’ या कार्यक्रमामध्ये एका परिक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे.

या लाइव्ह चॅटमध्ये अगदी कोल्हापूरपासून ते विदेशातील चाहत्यांनीही अमृताला काही प्रश्न विचारले. इथे लक्षात घेण्यासारखी बाब ही की, अमृता तिच्या काही चाहत्यांना अगदी नावानिशी ओळखते. चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज हे सर्व काही शक्य होत आहे असे म्हणत अमृताने चाहत्यांचे आभार मानले. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सुरेख भूमिकेनंतर आता त्याप्रमाणेच चांगले चित्रपट स्वीकारण्याचा मी प्रयत्न करेन असेही अमृता म्हणाली. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अंगप्रदर्शन करण्याची चढाओढ लागली आहे का? अशा एका प्रशनाला उत्तर देताना अमृता म्हणाली ‘मराठी चित्रपटाला जागतिक चित्रपटांसापून वेगळं करुच नका. मराठी सिनेमा ग्लोबल झाला आहे हे खरं. पण, त्याकडे ग्लोबल सिनेमाप्रमाणेच का पाहिलं जात नाही?’, असे सवाल करत ‘मराठी सिनेमा ग्लोबल व्हायचा असेल तर त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलला पाहिजे’, असे अमृताने स्पष्ट केले. ‘अंगप्रदर्शनाचं म्हणाल तर पाश्चिमात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्या गोष्टी तुम्हाला चालून जातात पण मग त्याच गोष्टी मराठी सिनेमामध्ये आल्या की, त्याचा तुम्हाला काय त्रास होतो? असा प्रश्न अमृताने उपस्थित केला आहे.

‘नच बलिये’ची स्पर्धक ते ‘२ मॅड’ची परिक्षक या प्रवासाविषयी सांगताना अमृता म्हणाली की, तो प्रवास खूपच स्ट्रगलचा होता. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील आवडता कलाकार कोण याबद्दल सांगताना अमृताने लगेचच अभिनेता अंकुश चौधरीच्या नावाला प्राधान्य दिले. एक चांगला मित्र असण्यासोबतच अंकुश एक चांगला अभिनेताही असल्याचे तिने स्पष्ट केले. मराठी सोबतच हिंदी टेलिव्हीजन विश्वातही अमृता खानविलकरच्या नावाला चांगलीच प्रसिद्धी प्राप्त आहे. अमृता सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी व्यग्र आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटामध्ये अमृता आणि अंकुश चौधरीची जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यासोबतच अमृता लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गप्पांच्या ओघात अमृताने अॅनिमेटेड चित्रपटांसाठी असणारे तिचे प्रेम, प्रियांका चोप्रासाठी असणारी तिची ‘फॅनगिरी’ आणि रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर या कलाकारंविषयीचे प्रेमही अमृताने व्यक्त केले. रिअॅलिटी शोचे वाढते प्रमाण पाहता विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अमृता म्हणाली की, ‘पालकांनी मुलांना आवड असेल तरच त्यांना रिअॅलिटी शो मध्ये पाठवले पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती होता कामा नये’, असे सांगत ‘पूर्ण विचार करुनच मुलामुलींना या प्रकारच्या शोजमध्ये पाठवा आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवता त्यांना या कार्यक्रमात सहभागी होऊद्या’, असेही अमृताने सांगितले. विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना अमृताने प्रेक्षकांना निराश तर केलेच नाही. पण, विविध विषयांवर ठामपणे मत मांडत अमृताने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
अमृता खानविलकरच्या या गप्पा आणि तिचे काही हटके प्लॅन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅट’चा संपूर्ण व्हिडीओ facebook.com/LoksattaLive येथे पाहता येईल.