आपल्या आईच्या दु:खद निधनामुळे बिग बॉसच्या घरातील प्रबळ दावेदार मनोज पंजाबी याला बिग बॉसचे घर अचानकपणे सोडावे लागले होते. बिग बॉस १० मधील स्पर्धकांमध्ये मनू हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. आईच्या आकस्मित निधनानंतर मनूला सदर दु:खद बातमी न देता बिग बॉसचे घर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मनुची आई सुजाता पंजाबी या मुलगा अमर पंजाबीसोबत जोधपूरमध्ये राहत होत्या. ७० वर्षाच्या मनूच्या आई सुजाता यांना हृदय विकाराचा झटका आल्याने जोधपूरमधील रुग्णालयत त्यांचे निधन झाले होते.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचे आदेश मिळाल्यानंतर मनू शनिवारी जोधपूरला पोहचला. त्यानंतर त्याने आपल्या आईवर अंत्यंसंस्कार केले. मनूचा जन्म जोधपूरमध्ये झाला असून जयपूरमध्ये तो लहानाचा मोठा झाला. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस या लोकप्रिय शोमध्ये त्याची सामान्य स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली होती. शनिवारच्या भागात मनूची प्रेयसी प्रियांकाही येऊन गेली होती. मनूची बिग बॉसमधील सहस्पर्धक मोनालिसा हिच्याशी जवळीक वाढत होती. त्यामुळे त्याचेच स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रियांका सलमानच्या शोमध्ये गेली होती. यावेळी तिने आयोजकांना मनूच्या आईचे निधन झाल्याचे सांगत घरातून बाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. मनू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचा भाग दाखवण्यात आला नाही. त्यामुळे आईचे अंत्यंसंस्कार केल्यानंतर मनू पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रियाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२ वाजता प्रियाला मनू पंजाबीची आई गेल्याची बातमी समजली. त्यानंतर तिने आयोजकांकडे मनूला घरी पाठविण्याची विनंती केली होती. मनूसाठी हा क्षण अतिशय दु:खद असल्याचे देखील तिने म्हटले होते. बिग बॉसच्या मागील पर्वात मॉडेल, अभिनेता केथ सिक्वेरा यालाही त्याच्या लहान भावाचे निधन झाल्यामुळे अर्ध्यातूनच शो सोडावा लागला होता. त्यानंतर आपल्या कुटुंबासह काही आठवडे घालवल्यानंतर तो पुन्हा शोमध्ये परतला होता. यात त्याची प्रेयसी रोशेल राव ही देखील सहस्पर्धक होती. मात्र, मनू पुन्हा या शोमध्ये परत येईल की नाही हा त्याचा वैयक्तीक निर्णय असणार आहे. पण आता त्याला त्याच्या कुटुंबासोबत असण्याची जास्त गरज आहे.