मराठी माणुस असं म्हटलं की त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं नित्सिम प्रेम डोळ्यांसमोर येतं. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही लोकं करतात. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महारांपेक्षा खूश दुसरे कोणीच नसते.

हेमंत ढोमेच्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केलं असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा टिझर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. उत्तम सिनेमॅटोग्राफीचे दर्शन या काही मिनिटांच्या टिझरमध्ये होते. यात महाराष्ट्रातले गड, किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे.

सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार जाण्यासाठी मागे पुढे पाहत नाही हेच दिसून येतंय. प्रथमदर्शनी टिझर बघितल्यानंतर चाहत्यांच्या उत्सुकता वाढतील यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

हेमंत ढोमेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या संदर्भातली माहिती दिली. चला महाराष्ट्राचं वैभव परत आणुया म्हणतं त्याने ३ फेब्रुवारीही तारीख घोषित केली. त्यामुळे एक चांगल्या आशयाचा सिनेमा प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे हे मात्र नक्की.

दरम्यान, ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमाच्या कामाच्या निमित्त जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे आणि क्षिती जोग हे कलाकार असेच एकत्र भेटले होते. काही दिवसांपूर्वी या चौघांनी सिनेमासाठीच लंडनवारीही केली होती. वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर ताव मारत असताना असाच एक सेल्फीही त्यांनी काढला. हेमंतने हा फोटो सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला. फ्रेन्च फ्राइज तोंडात धरुन राक्षसाची पोझ यावेळी या चौघांनी दिली. सध्या हे चौघंही ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमाच्या कामात व्यग्र आहेत.