एकीकडे फिल्म सर्टिफिकेट अपिलेट ट्रिब्युनलने (FCAT) ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ला आठ कट देत चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांना दिलासा दिला असतानाच चित्रपटासमोर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचे कळते. ‘इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स’ने हे वृत्त दिलंय. पोस्टर प्रदर्शनापासूनच या चित्रपटाला अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. आता चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटामध्ये सुरुवातीला ४८ कट्स सांगितले होते. एवढे कट्स सांगितल्याने निर्माते-दिग्दर्शकांनी ट्रिब्युनलकडे आपला मोर्चा वळवला. अखेर या कट्सची संख्या कमी करत ट्रिब्युनलने आठ छोटे कट्स सांगत चित्रपटाला मान्यता दिली. ऑनलाइन पायरसी हा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यापूर्वी प्रदर्शित झालेला अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटही पायरसीचा शिकार झाला होता. कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या पेनड्राईव्हमध्ये हा चित्रपट मिळाला होता.

वाचा : बॉलिवूडमध्ये मी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता- नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ २५ ऑगस्ट म्हणजेच उद्या प्रदर्शित होत आहे. कुशन नंदी दिग्दर्शित या चित्रपटात बंगाली अभिनेत्री बिदिता बागही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच दिवशी सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसचा ‘अ जंटलमन’सुद्धा प्रदर्शित होतोय.