गेले काही दिवस अभिनेत्री सोनम कपूर विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या सर्व चर्चांमध्ये तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ चे विषयही रंगत आहेत. सोनमची बहिण रिहा कपूरच्या निर्मितीमध्ये बनणाऱ्या या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या लांबणीवर पडले आहे. अभिनेत्री करिना कपूरही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. पण सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण लांबणीवर जाण्याचे एक कारण समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या करिना कपूरमुळे या चित्रिकरणास उशीर होत असे अभिनेत्री सोनम कपूर हिने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.
काही वृत्तपत्र आणि संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार करिनाला ‘प्रेगनेंन्सी इन्शोरन्स’ न मिळाल्यामुळे या हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. या बाबतीत वक्तव्य करत असताना ‘भारत एकमेव असा देश आहे जेथे गरोदर स्त्रियांसाठी ‘प्रेगनेंन्सी इन्शोरन्स’ दिला जात नाही’, असेही तिने स्पष्ट केले.

वाचा: सोनम आणि आनंदच्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब?
बऱ्याच चर्चा रंगवणाऱ्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामध्ये करिना कपूरसह सोनम कपूर आणि स्वरा भास्कर या अभिनेत्रीसुद्धा दिसणार आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ हा एक महिलाप्रधान चित्रपट असणार आहे. तुर्तास सोनमच्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.