केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदावरून शुक्रवारी पहलाज निहलानी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या आडमुठ्या आणि वादग्रस्त मार्गदर्शक तत्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. मात्र जाता जाताही त्यांनी चित्रपटसृष्टीला एक धक्का दिला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसचा ‘अ जंटलमन’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. मात्र चित्रपटातील जॅकलिन आणि सिद्धार्थच्या किसिंग सीनवर निहलानी यांनी आक्षेप घेतला होता. ते सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना चित्रपटाला ‘यु/ए’ प्रमाणपत्र हवं असल्यास किसिंग सीनला ७० टक्क्यांनी छोटा करण्यास सांगितलं होतं. चित्रपटात दीर्घ किसिंग सीनची आवश्यकताच नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

निहलानींच्या अध्यक्षतेखाली सेन्सॉर बोर्डाने यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मधील अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचा किसिंग सीन आणि जेम्स बाँड सीरीजमध्ये असलेल्या किसिंग सीनवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे जाता जाता निहलानी यांनी आणखी एक झटका दिला असं म्हणायला हरकत नाही.

‘अक्षरा’च्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ ऐकलंत का?

निहलानी यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ‘मी गेल्यानंतर आता सगळ्या चित्रपटांमध्ये पॉर्न आणि अश्लील दृश्यच दाखवली जातील’, अशा शब्दांत निहलानी यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. याशिवाय काही निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.