शाहरुख खानच्या रईसचा ट्रेलर आज रिलीज झाला. त्याचवेळी २५ जानेवारी रोजी आपण हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे शाहरुखने जाहीर केले. याच दिवशी हृतिक रोशन आणि यामी गौतमी यांचा काबील हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन यांनी शाहरुख खानच्या या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. आम्ही जी पण तारिख निश्चित करीत आहोत त्याच तारिखेला शाहरुख खानने चित्रपट प्रदर्शित करण्याचे जाहीर करीत आहे असे ते म्हणाले.

काबील हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार होता. परंतु, रईस या चित्रपटासोबत याचे प्रदर्शन नको म्हणून राकेश रोशन यांनी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख अलीकडे केली. २५ जानेवारीला सायंकाळी हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल असे त्यांनी जाहीर केले होते. नंतर शाहरुख खानने आपल्या प्रदर्शनाची तारिख बदलून २५ जानेवारी केली.

याबाबत राकेश रोशन म्हणाले, मी जुन्या विचारसरणीचा माणूस आहे. गेली ५० वर्षे मी या क्षेत्रात काम करीत आहे. दुसऱ्या निर्मात्याने जर चित्रपट प्रदर्शनाची तारिख जाहीर केली असेल तर मी कधीही माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख त्या दिवशी ठेवत नाही. परंतु, हे लोक माझ्याच चित्रपटाच्या दिवशी त्यांचा चित्रपट रिलीज करीत आहे असे ते म्हणाले.

आपल्या वडिलांचे समर्थन करताना हृतिक रोशन म्हणाला की माझे वडील तत्वनिष्ट आहेत. जर कुणी आधी आपली तारिख जाहीर केली असेल तर ते कधीच आपला चित्रपट त्या दिवशी प्रदर्शित करीत नाहीत. २०१८ च्या ख्रिसमसला माझा क्रिश ४ हा चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवले होते. परंतु शाहरुख खानचा चित्रपट त्याच दिवशी येणार असल्यामुळे आम्ही या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिख बदलली.

आम्हाला वाटले असले तर आम्ही दंगल किंवा बेफिक्रे ज्या दिवशी रिलीज होणार आहे त्याच दिवशी काबील रिलीज केला असता परंतु तब्बल ११ महिने आधी आम्ही ही तारिख जाहीर केली. मला या सर्व गोष्टीत खरं तर पडायची इच्छा नाही कारण मला ते कळत देखील नाही असे उद्विग्न अवस्थेतील हृतिकने म्हटले.

रईसच्या ट्रेलर लाँचच्या वेळी शाहरुख खानला याबाबत विचारणा करण्यात आली. आम्ही सर्व वितरकांबरोबर याबाबत चर्चा केल्याचे शाहरुखने म्हटले. २६ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे त्याआधी चित्रपट रिलीज करणे हे तर्कपूर्ण असल्याचे शाहरुखने म्हटले. आम्ही नियमित वेळी चित्रपट प्रदर्शित करणार आहोत तर काबील हा सायंकाळी प्रदर्शित केला जाईल असे त्याने म्हटले.