राज्यालाच नव्हे तर देशाला याडं लावणाऱ्या नागराजच्या ‘सैराट’ कलाकृतीला अभिनेत्री अमृता सुभाषने ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या मंचावरुन सलाम केला. नागराज मंजुळेच्या ‘सैराट’चे वारे अद्यापही कमी झालेले नाही. याची प्रचिती मंगळवारी लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये अनुभवायला मिळाली. अमृता सुभाष तिच्या ‘ ६ गुण’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये आली होती. या कार्यक्रमात राहुल सोनावणे नावाच्या एका प्रेक्षकाने अमृताला ‘सैराट’ चित्रपटाबद्दल तिचे मत विचारले. यावेळी तिने एका क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट भन्नाट असल्याचे सांगितले.

#SairatMania : .. म्हणून अरबाजवर आली रडण्याची वेळ!

मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटाबद्दल अमृता म्हणाली, ‘सैराट’ हा चित्रपट खूप आवडला. नागराज हा माझा खूप जवळचा मित्र आहे. त्याचा ‘फॅन्ड्री’ देखील मला फार भावला होता. या चित्रपटातून नागराजने महत्त्वाचा विषय मांडला आहे.’ यावेळी तिने नागराजच्या मनात ‘सैराट’च्या कल्पनेने कशा प्रकारे जन्म घेतला याबद्दलची आठवण सांगितली. अमृता म्हणाली की, ‘नागराज आणि मला एकाचवेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी वेगळ्या जातीत लग्न केल्यामुळे एका मुलाला मारल्याची प्रत्यक्ष घटना घडली होती. त्यावेळीच ‘सैराट’च्या निर्मितीविषयी नागराज माझ्याशी बोलला होता.’ या घटनेला उजाळा देताना तिने सध्या देखील असे प्रकार घडत असल्याचे उदाहरण सांगितले. नुकतेच एका पित्याने असे कृत्य केल्याचे सांगत तिने नागराजचा मुद्दा हा समाजातील अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि अप्रतिम मांडणी असल्याचे तिने म्हटले. एवढेच नाही तर नागराजने चित्रपटाच्या माध्यमातून असे विषय पुन्हा मांडावेत, यासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या.

#SairatMania : अन् ‘उबर’चा मेसेज आला ‘मंग्या ऑन द वे….’

चित्रपटाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर तिने आर्ची आणि परश्यासह संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘या चित्रपटाने घवघवीत यश मिळवलय. ‘सैराट’मुळे आमच्या चित्रपटसृष्टीचा उत्साह दुणावलाय. मराठी चित्रपटाने घेतलेली कोटीच्या कोटी उड्डाणे आणि हिंदी चित्रपटाच्या बरोबरीने केलेली  कमाई कौतुकस्पद आहे.  तसेच हा चित्रपट अनेक भाषेमध्ये रिमेक होणं ही अभिमानाची गोष्ट असल्याचे अमृता यावेळी म्हणाली.

#SairatMania : सहजच आलास अन् ‘सैराट’ झालास…