‘सुलतान’च्या सेटवर केलेल्या मेहनतीचे उदाहरण देताना स्वत:ची तुलना बलात्कारित महिलेशी करून नवा वाद निर्माण केलेल्या सलमान खानची त्याचा भाऊ अरबाझ खानने पाठराखण केली आहे. सलमानचा विधानामागचा हेतू चुकीचा नव्हता, त्याच्या वक्तव्याकडे एक वाद म्हणून पाहिले जाऊ नये, असे अरबाझ म्हणाला.

.. तेव्हा मला बलात्कारित महिलेप्रमाणे वाटायचे- सलमान खान

स्पॉटबॉय वेबपोर्टलला दिलेल्या विशेष मुलाखतीत सलमानने सुलतान चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव कथन करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. जेव्हा मी चित्रीकरण संपवून रिंगणातून बाहेर यायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे वाटायचे, असे सलमान म्हणाला होता. सलमानच्या या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सलीम खान यांनीही सलमानच्या विधानावर माफी मागितली. अरबाझने मात्र सलमानची पाठराखण केली आहे.

अरबाझ म्हणाला की, ‘सलमान कोणत्या उद्देशाने बोलत होता ते फार जास्त महत्त्वाचे आहे. त्याच्या विधानामागचा हेतू नक्कीच वाईट नव्हता. चित्रीकरणावेळी आपल्या खांद्यावर जणू डोंगराऐवढे ओझे होते किंवा मला अगदी ओझे वाहणाऱया गाढवासारखे वाटत होते, असे सलमानला सांगायचे होते. मी येथे गाढव शब्द उदाहरण म्हणून वापरला मग आता प्राणीमित्र नाराज होणार का? काहीवेळेस तुम्हाला तुमच्या भावना प्रखरतेने पटवून देण्यासाठी उदाहरणे द्यावी लागतात. त्याकडे वाद म्हणून पाहू नये, पण नक्कीच विधान केल्यानंतर आपण केलेली तुलना योग्य नसल्याचे सलमानला कळून चुकले आहे. मात्र, याबाबत त्याने माफी मागवी की नाही हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे, असेही अरबाझ पुढे म्हणाला.