‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला सुरु असलेला विरोध थांबण्याची चिन्हे नाहीत. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली. पाकिस्तानविरोधात  घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने काम केले आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली होती. त्यामुळे हा चित्रपट अडचणीत सापडला होता. चित्रपट प्रदर्शित केल्यास ‘फटाके’ फुटतील असा इशाराच मनसेने दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मध्यस्थी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला मनसेचा विरोध मावळला होता.

निर्मात्यांनी सैन्यासाठी पाच कोटी रुपये देण्याचे ‘डील’ निश्चित झाल्यावर मनसेने माघार घेतली होती. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्किल’ची दिवाळी निर्विघ्न पार पडणार अशी आशा होती. मात्र शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होताच पुन्हा एकदा विरोध सुरु झाला आहे. कल्याणमध्ये सर्वोदय चित्रपटगृहाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्याची दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ऐ दिल है मुश्किलसोबत अजय देवगन दिग्दर्शित शिवाय हा चित्रपटही आज प्रदर्शित झाला आहे.