डिअर बर्थडे बॉय… तुझ्या अभिनयाच कौतुक करावं की, तुझ्या स्पेशॅलिटीच.. हे आतापर्यंत न सुटलेल कोडं. तशी तुझ्या कारकिर्दीची सुरुवात ‘फुटपाथ’ने झाली. पण मी तुला पाहिलं ते ‘मर्डर’मध्ये. या चित्रपटातील खुनाचा छडा लागल्याचे समजले. पण, त्यात मल्लिकावर तू प्रेम करत होतास की ती जबरदस्ती होती ते मला शेवटपर्यंत कळलं नाही. ‘तुमसा नही देखा’ म्हणत दिया मिर्झाला तू चित्रपटामध्ये तुझ्या प्रेमात पाडलंस. ती पॅसिफिक सुंदरी असल्यामुळे तो माझ्यासारखाच अनेकांना धक्का होता. त्यानंतर तुझ्या चुंबनाच ‘जहर’ दिवसेंदिवस वाढतच गेलं. ‘आशिक बनाया आपने’ मध्ये तनुश्री दत्तसोबतचा गुंता इतका भयानक होता की, तुझ्यावर ‘सिरियल किसर’चा ठपकाच पडला.

आता यात तुझा तसा काय दोष म्हणा.. बॉलिवूड जगतामध्ये अभिनेत्री ज्याप्रमाणे कथानकाची गरज म्हणून तोकड्या कपड्यात दिसतात. तेच तू चुंबनदृश्यांबाबत केलसं, असे समर्थन करण्यास मला निश्चितच वाव आहे. पण तुझ्या नशिबाला दाद देतो. याच कारण हे की, प्रत्येक चित्रपटात तू एका वेगळ्या नायिकेबरोबर स्क्रिन शेअर केलीस. एवढेच नाही तर तुझ्यावर चित्रित झालेल्या गाण्यांनी तरुणाईच्या मनात घर केलंय. तुझ्या चुंबनाची अॅलर्जी असणारासुद्धा त्या गाण्यात मग्न होतो. यातूनच मला हा निष्कर्ष काढता आला.

सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये बोल्ड दृश्यांची बरसात दिसते. पैकी काही सेन्सॉरमध्ये अडखळतात तर काही तुझ्या चित्रपटांपेक्षाही वरचढ असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण तुला लाभलेल्या उपाधीला काडीमात्र फरक पडत नाही. चुंबनदृश्यांना कला म्हटले तर चावटपणा वाटेल, पण तसे असेल तर तुझ्यासारखा दुसरा कलाकार खरंच होणे नाही. बॉलिवूड अभिनेत्री त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य कसे सांभाळत असतील? हा जसा प्रश्न पडतो, अगदी तसाच प्रश्न तुझ्याकडे पाहिल्यानंतरही पडतो.

पण, मी ज्यावेळी तुझ्या वैयक्तिक आयुष्यात डोकावतो, त्यावेळी तू मला एका वेगळ्या रुपात भेटतोस. तुझी ओळख निर्माण झालेल्या ‘किस’ चा आधार घेत ‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकातून तुझ्या आयुष्यातील वादळ किती भयानक आहे, याची कल्पना येते. तुझ्या मुलाने कॅन्सरशी दिलेली झुंज अंगावर शहारे आणते. तर चित्रपटातील प्रत्येक चुंबनासाठी पत्नीला समजावण्याचा किस्सा तुझ्यातील वेगळ्या प्रेमाचा रंग दाखविणारा म्हणावा लागेल.

हॅप्पीवाला बर्थडे इमरान हाश्मी!

तुझाच एक चाहता…