गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये सनी लिओनी आई होणार का, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. सनी व तिचा पती डॅनिअल वेबर यांनी गुरूवारी एका मुलीला दत्तक घेतल्याचे जाहीर केले. या दोघांनी लातूरमधील २१ महिन्यांच्या निशा कौर वेबर या गोंडस मुलीला दत्तक घेतले आहे. ‘निशाला पाहताक्षणीच आम्ही तिच्या प्रेमात पडलो’ असे सनीने नमूद केले. निशाला पाहताक्षणीच आम्ही तिच्या प्रेमात पडलो. आम्ही निशाला निवडले नाही, तिनेच आमची (पालक) निवड केली, असे सनी लिओनीने सांगितले.

काही दिवसांपूर्वी ‘स्पॉटबॉय’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सनीने आपल्याला आई व्हायचे वेध लागल्याचे म्हटले होते. सध्याच्या कामांच्या व्यापामुळे शारिरीकदृष्ट्या आई बनणं कठीण वाटतंय. व्यावसायिक पातळीवर माझ्या आयुष्यात सध्या खूप गोष्टी घडत आहेत. पण भविष्यात काय होईल कोणाला माहित. कोणास ठाऊक, काही दिवसांत माझ्या हातात तुम्हाला माझे बाळ दिसेल आणि सगळ्यांना धक्का बसेल. शेवटी हे बाळ आले कुठून, असा प्रश्न सगळ्यांना पडेल, असे सूचक विधान तिने केले होते. त्यामुळे सनी लिओनी एखादे मुल दत्तक घेईल किंवा सरोगसी पद्धतीचा वापर करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ही शक्यता खरी ठरली आहे. सनीच्या व्यावसायिक कामांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘बादशाहो’ या सिनेमात आयटम डान्स करताना दिसणार आहे. सध्या ती एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सव्हीला’ कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार सरोगसीद्वारे आई- वडील झाले आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरूखपासून ते आमिर खानपर्यंत आणि करण जोहरपासून ते तुषार कपूरपर्यंत अनेकजण सरोगसीद्वारे पालकत्वाचा आनंद घेत आहेत.