अंडरवर्ल्डच्या कित्येक कथा बॉलीवुडपटांमधून रुपेरी पडद्यावर जिवंत झाल्या आहेत. दाऊद, हाजी मस्तान, पठाण गँगपासून अनेकांच्या कथा, किंवा त्यांच्यावरून प्रेरित होऊन के लेले असे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘रामन राघव २.०’ चित्रपटाचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला. साठच्या दशकात मुंबईकरांवर दहशत पसरवणाऱ्या या माथेफिरू खुन्याचे नावही लोकांना, पोलिसांना नकोसे वाटते. त्याची कथा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत नाही आहे हेही विशेष. याआधी ‘बदलापूर’ फेम दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी रामन राघववर त्याच्याच नावाने एक लघुपट केला होता. किंबहूना, त्याच लघुपटापासून प्रेरणा घेऊन अनुरागने यावर पूर्ण लांबीचा चरित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यासाठी लागणारे बजेट आणि यशाची आर्थिक गणिते याचा विचार करत अनुरागने आपला विचार बदलला. मूळ रामन राघवपासून प्रेरणा घेऊन आत्ताच्या जमान्यातला ‘रामन राघव २.०’ आपल्याला पहायला मिळणार असला तरी त्यानिमित्ताने हा रामन राघव कोण होता आणि त्याची नेमकी कोणती गोष्ट अनुरागसारख्या दिग्दर्शकाला चित्रपटापर्यंत घेऊन आली असावी, याबद्दलचा हा धांडोळा..
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामन राघव २.०’ या चित्रपटामुळे मुंबईत एकेकाळी कमालीची दहशत पसरवणाऱ्या रामन राघव या माथेफिरुच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. साठच्या दशकात जेव्हा मुंबईतील उपनगरे जंगल आणि झोपड्यांच्या वस्त्यांनी भरलेली होती. त्यावेळी एकामागोमाग होत असलेल्या निर्घृण हत्यांनी केवळ मुंबईकरच नव्हे तर मुंबई पोलीसही हादरुन गेले होते. तब्बल ४१ हत्या (रामन राघवने कबूल केलेल्या) करणाऱ्या या माथेफिरुची आठवण आजही ती दहशत अनुभवलेल्यांच्या अंगावर काटा आणते.
५ जुलै १९६८ साली मालाड या मुंबईतील पश्चिम उपनगरात सकाळ झाली ती एका थरकाप उडवणाऱ्या हत्येने. घराबाहेर झोपलेल्या अब्दुल करीम या उर्दू शिक्षकाची डोक्यावर घाव घालून हत्या केल्याचे उघडकीस आले. हत्येनंतर हल्लेखोराने करीम यांच्याकडील काही वस्तू पळवल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत गोरेगावमध्ये आणखी एक हत्या झाली. एकाच पध्दतीने झालेल्या हत्यांनी मुंबईत कोणी माथेफिरु तर वावरत नाही ना अशी चर्चा सुरू झाली. त्याच सुमारास झालेल्या आणखी एका तिहेरी हत्याकांडाने मुंबईकर सुन्न झाले. मालाडमध्ये दाम्पत्यासह त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीची डोक्यात घाव घालून हत्या करण्यात आली होती. मृत महिलेसोबत हल्लेखोराने शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर घरात-घराबाहेर झोपलेल्या झोपड्या-वस्त्यांमधील माणसांचे एकामागून एक खून होऊ लागले. खुट्ट झाले तरी हल्लेखोर आला असे म्हणत परिसरात पळापळ होऊ लागली. अनुरागच्या चित्रपटात नवाजुद्दीनने साकारलेल्या रामनची आपली ओळख अशीच होते. त्याने सुरूवातीच्या काळात केलेल्या या हत्याकांडामागचे काही एक कारणही आपल्याला चित्रपटात पहायला मिळते. मात्र या हत्याकांडांमुळे हवालदिल झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी ज्या पातळीवर या माथेफिरूचा शोध घेतला तो अजूनही रुपेरी पडद्यापासून दूर आहे.
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त इ. एस. मोडक यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना या हत्यांचा छडा लावण्यास सांगितले. पोलीसांच्या तपासामध्ये १९६६ साली एका हत्येच्या तपासात रामन राघव नावाच्या संशयिताला पोलीसांनी पकडून तडीपार केल्याचेही स्पष्ट झाले. त्यावेळी रात्री-बेरात्री फिरणाऱ्या प्रत्येकाची उचलबांगडी एकीकडे तर दुसरीकडे वस्त्या-वस्त्यांमधून लोकांनी स्वत:च स्वीकारलेली गस्तीची जबाबदारी अशा भयाण अवस्थेत मुंबईच्या रात्री जागत होत्या. शहरातील प्रत्येक पोलीस या क्रूरकम्र्याच्या शोधात फिरत असतानाच ऑगस्ट महिन्यात आणखी तीन हत्या झाल्या आणि त्याने पोलीसांची झोपच उडाली. चहूबाजूंनी पोलिसांवर टीका होऊ लागली.
रामन राघवची धरपकड
सगळ्या पोलीस दलाला घाबरवून सोडणाऱ्या या रामन राघवच्या धरपकडीची कथा खरोखरच एखाद्या चित्रपटात शोभावी इतकी नाटय़मय आहे. २५ ऑगस्टच्या सकाळी इन्स्पेक्टर अलेक्स फियालोह ते राहात असलेल्या भेंडी बाजारमधल्या पोलीस वसाहतीकडे निघाले होते. डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अलेक्स यांना पोलीस ठाण्याजवळून जाताना समोरुन येणारी एक व्यक्ती दिसली. हातात छत्री घेऊन घाईघाईने चाललेल्या व्यक्तीला त्यांनी थांबवले. शहरात पावसाचा टिपूसही नसताना छत्री घेऊन हिंडणारी ही व्यक्ती शहराबाहेरची असावी, ही शंका अलेक्स यांना सतावत होती. त्यांनी कामाचे निमित्त सांगून या व्यक्तीला डोंगरी पोलीस वसाहतीच्या दिशेने नेले. रामन राघवचे जारी केलेले छायाचित्र आणि त्याच्या वर्णनाशी मिळतीजुळती अशी ही व्यक्ती खरोखरच रामन राघव आहे का? आणि असलीच तर ती आपल्यावर हल्ला तर करणार नाही?, अशा विचारांच्या चक्रात अडकलेल्या अलेक्स यांनी त्याला त्याचे नाव विचारले. कपडय़ांवर काही रक्ताचे डाग असलेल्या या व्यक्तीने त्याचे नाव ‘सिंधी दलवाई’ असल्याचे सांगितले. रामन राघवसारखा दिसणारी एक व्यक्ती आपण पकडली असून लवकरात लवकर कुमक पाठवा, असा अलेक्स यांचा दूरध्वनी डोंगरी पोलिस ठाण्यात जाताच एकच खळबळ माजली. त्यावेळचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी हेही पोलिस ठाण्यात हजर झाले. रामन राघवचे छायाचित्र या सिंधी दलवाईला दाखवण्यात आले, त्यावेळी आपल्यासारख्याच व्यक्तीचे ते छायाचित्र असले तरी तो मी नव्हेच हे पालूपद त्याने सुरु ठेवले. पण, त्याच्या बोटांचे ठसे जुळल्यावर तोच ‘रामन राघव’ आहे यावर शिक्कमोर्तब झाले. क्रूरकर्मा रामन राघवला अटक झाल्याचे कळताच डोंगरी पोलीस ठाण्याबाहेर हजारो लोकांनी गर्दी केली होती.
पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतरही मूग गिळून बसलेल्या रामन राघवचे तोंड त्याच्या इच्छेनुसार चिकन, मटन खायला दिल्यानंतर खुलले. अगदी शांतपणे त्याने सगळ्या हत्यांची माहिती दिली. ज्या लोखंडी रॉडने तो हत्या करत होता तोही गोरेगावच्या आरे कॉलनीतून त्यानेच शोधून दिला. रामनला आधी स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान करण्यात आले त्यामुळे न्यायालयाने त्याला फाशी न देता जन्मठेप सुनावली. येरवडा तुरुंगात उर्वरित आयुष्य काढणाऱ्या रामनचा १९९५ साली ससून रुग्णालयात मूत्रिपडाच्या विकाराने मृत्यू झाला.
कोणतेही ठोस कारण नसताना एकापाठोपाठ एक ४१ हत्या करणाऱ्या रामन राघव नावाच्या कथेला चार दशकं उलटली आहेत तरी त्याचे दहशतीचे दिवस मुंबईकरांच्या आठवणीतून गेलेले नाहीत. याआधी श्रीराम राघवन यांनी केलेल्या लघुपटाचा फारसा गाजावाजा झाला नव्हता. त्यात रामनची भूमिका अभिनेता रघुवीर यादवने केली होती. अनुरागच्या चित्रपटात ही भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या आणि मुंबईकरांच्या मनात खपली धरलेली ‘रामन राघव’ नावाची जखम पुन्हा भळभळते आहे.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप